14 एकरवर नवी फिल्म सिटी! दादासाहेब फाळके चित्रनगरीचा विस्तार

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
मुंबई,
dadasaheb falke filmcityफिल्म सिटीचा आता आणखीन विस्तार होणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सध्या गोरेगावमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरी आहे. पण आता मानखुर्दमध्येही 14 एकर जमिनीवर फिल्म सिटी उभारली जाणार आहे. या ठिकाणी बाह्य चित्रकरणासाठीची जागा तयार केली जाणार आहे. त्यामुळे ठाणे, मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या दृष्टीने दुसरी फिल्म सिटी सोयीस्कर होईल.
 
falke
 
मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील सर्व्हे क्रमांक 138 पैकी तसेच लगतच्या मिळकतीतील अंदाजे 14 एकर म्हणजेच सुमारे 56 हजार 666 चौ.मी. जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला बाह्य चित्रिकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमीन महाराष्ट्र जमीन महसूल जमीन संहिता, 1966 मधील कलम 40 नुसार प्राप्त अधिकारात महसूल मुक्त आणि भोगाधिकार मूल्यरहित किंमतीने देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. बाह्य चित्रिकरणासाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यासाठी आज शासनाने मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या वतीने सेलिब्रिटींकरिता अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत.
 
 
“महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावाने असलेल्या चित्रनगरीच्या विकासासाठी बाह्य चित्रिकरणासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देताना शासनाने सार्वजनिक हित आणि जमिनीचा नियोजनबद्ध वापर यांचा समतोल साधला आहे.”, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दरम्यान, बाह्य चित्रिकरणासाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यास शासनाची मान्यता मिळाल्यानंतर महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार सुद्धा मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राला निश्चितच चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया सुद्धा बावनकुळे यांनी दिली आहे.