महिलेचे फोटो वापरून इन्स्टाग्रामवरुन बदनामी

सायबर पोलिसांत गुन्हा

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
defamation-on-instagram एका महिलेचे फोटो तिच्या संमतीशिवाय वापरून इन्स्टाग्रामवर दोन बनावट खाती तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या खात्यांवरून महिलेच्या मित्र-मैत्रिणींसह अन्य व्यक्तींना फॉलो रिक्वेस्ट पाठवून तिची ओळख गैरप्रकारासाठी वापरणे आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

defamation-on-instagram 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ या कालावधीत आरोपींनी इन्स्टाग्रामवर दोन बनावट खाती तयार केली. या खात्यांच्या प्रोफाइलवर पीडित महिलेचा फोटो वापरण्यात आला होता. तसेच तिचे अन्य काही फोटोही तिच्या परवानगीशिवाय अपलोड करण्यात आले. बनावट खात्यांवरून महिलेच्या मित्र-मैत्रिणींना आणि इतर परिचितांना फॉलो रिक्वेस्ट पाठविण्यात आल्या. त्यामुळे ही खाती संबंधित महिलेनेच सुरू केली असल्याचा समज निर्माण होण्याची शक्यता होती. तिचे फोटो आणि ओळख परस्परांच्या संमतीशिवाय वापरून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आपल्या नावाने आणि छायाचित्रांचा वापर करून सोशल मीडियावर बनावट खाती सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी ऑनलाइन ओळख चोरी, फसवणूक आणि पाठलागासंदर्भातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस करीत आहेत.