वरूड
fisheries-society-inspection यशस्वी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, जामगाव येथील कथित बोगस व निष्क्रिय सभासदांची तांत्रिक तपासणी करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला आता गंभीर वळण मिळाले आहे. पाक प्रकल्प जलाशयावर तपासणीसाठी आलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन न देता वाहनाने निघून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहन अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना वाहनाने धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे.
खडका येथील रुपाली नरेंद्र कुरवाडे यांच्यासह चार महिलांनी तपासणी करण्याच्या मागणीसाठी २५ ऑगस्टपासून वरूड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त मॉन्टी मेश्राम यांनी २७ ऑगस्ट रोजी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. आश्वासनाची पुर्तता न झाल्याने महिलांनी २१ सप्टेंबर रोजी पाक प्रकल्प जलाशयात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला. विभागाने १ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या सर्व सभासदांची तांत्रिक तपासणी घेण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानुसार अधिकारी पाक प्रकल्पावर दुपारी १२ वाजता पोहोचले; मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत संस्थेचे पदाधिकारी अथवा सभासद तपासणीसाठी उपस्थित झाले नसल्याचा आरोप आहे. यावेळी आंदोलकांनी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आणखी दहा दिवसांची मुदत देऊन पुन्हा तपासणी घ्यावी, तसेच त्याबाबत लेखी पंचनामा व आश्वासन द्यावे, अशी मागणी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन न देता वाहनाने निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. वाहन रोखण्याचा प्रयत्न करताना दोन जण जखमी झाले. या घटनेप्रकरणी बेनोडा पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. न्याय मिळेपर्यंत पाक प्रकल्पावरून हटणार नसल्याचा निर्धार महिलांसह आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
भोई समाजावरील अन्यायाचा निषेध
स्थानिक भोई समाजाच्या रास्त मागण्यांसाठी दिलेले आश्वासन न पाळता संबंधित अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे पळ काढणे योग्य नाही. त्यांनी स्थळ पंचनामा करून पुढील तांत्रिक तपासणीबाबत तारीख सुनिश्चित करून तोडगा काढणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता वातावरण चिघळुन मच्छीमार समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करतो तसेच याप्रकरणाची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सहकार भारतीच्या मच्छ प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा भाजपा मच्छीमार सेल अमरावती जिल्हाध्यक्ष वासुदेव सुरजुसे यांनी केली आहे.