नवी दिल्ली
largest-crackdown कन्नड अभिनेत्री रान्या रावला तब्बल ८९.९१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रान्यासह इतर तिघांना देखील दंड केला असून या चौघांवर ठोठावण्यात आलेल्या दंडाची एकूण रक्कम २४४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
रान्या रावला बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात सोने जप्त झाल्यानंतर अटक करण्यात आली होती. या प्रकरणात कस्टम्स विभागाने आता ८९.९१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दुबईहून भारतात ११३ किलोपेक्षा जास्त सोने आणल्याच्या कथित तस्करी प्रकरणाशी संबंधित ३९९ पानांच्या सविस्तर कस्टम्स अॅडज्युडिकेशन ऑर्डरमध्ये हा दंड ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणातील इतर तीन आरोपी तरुण कोंडुरू राजू, साहिल जैन आणि भरत कुमार जैन यांच्यावरही दंडाची कारवाई करण्यात आली आहे. कस्टम्सच्या आदेशानुसार रान्या रावला ८९.९१ कोटी रुपये तर तरुण कोंडुरू राजूला ४९.५१ कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. साहिल जैन आणि भरत कुमार जैन या दोघांवर प्रत्येकी ५३.०६ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान सोन्याची कथित तस्करी
कस्टम्सची ही कारवाई मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दुबईहून भारतात कथितरीत्या वारंवार सोने आणल्याच्या आरोपांच्या तपासानंतर करण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार या कालावधीत संबंधित नेटवर्कच्या माध्यमातून ११३ किलोपेक्षा जास्त सोने भारतात आणण्यात आले.
या प्रकरणातील तपासामध्ये सोन्याच्या कथित तस्करीची पद्धत, आरोपींच्या प्रवासाची माहिती, आर्थिक व्यवहार आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासण्यात आले. या कथित नेटवर्कमध्ये कोणाची काय भूमिका होती, याचाही तपास करण्यात आला.