वडिलोपार्जित हक्कासाठी शेतकरी चढला टाॅवरवर

गुरुकुंज मोझरीत वीरूगिरी

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
तिवसा
farmer-climbs-tower जमिनीच्या मालकी हक्कासह फेरफार नोंदी आणि हस्तांतरणाच्या कथित अनियमिततेच्या प्रकरणावरून शेतकरी प्रदीप श्यामराव डाखोरे यांनी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. आपल्या जमिनीच्या प्रकरणात अन्याय होत असल्याचा आरोप करीत डाखोरे हे गुरुकुंज मोझरी येथील बसस्थानकासमोरील मोबाईल टॉवरवर चढले आणि गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन सुरू केले. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनीही टॉवरखाली ठिय्या देत आंदोलनाला पाठिंबा दिला.
 
veerugiri
अमरावती जिल्ह्यातील सर्फाबाद, हिरुळ पूर्णा आणि नारायणपूर येथील भोगवट वर्ग-२ मधील सुमारे १६ एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून हे प्रकरण अचलपूर एसडीओ कार्यालयात सुरू असल्याचे डाखोरे यांनी सांगितले. या प्रकरणात अनेकदा सुनावणी होऊन विविध आदेश पारित झाले असतानाही आपल्याला न्याय मिळालेला नाही, उलट अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला. डाखोरे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन प्रकरणात कथित बनावट कागदपत्रे व सेल सर्टिफिकेटच्या आधारे जमिनीचे हस्तांतरण करण्यात आल्याचा संशय आहे. तसेच भोगवट वर्ग-२ मधील जमीन आवश्यक परवानग्यांशिवाय वर्ग-१ मध्ये रूपांतरित केल्याचे दाखवून खरेदी-विक्री करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
या संपूर्ण प्रकरणात तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महसूल नोंदी, फेरफार प्रक्रिया, जमिनीच्या हस्तांतरणाशी संबंधित कागदपत्रे आणि संबंधित आदेशांची पडताळणी करून सत्य समोर आणावे, अशी त्यांची मागणी आहे.
 
आंदोलनाची माहिती मिळताच तिवसा येथील नायब तहसीलदार आशिष नागरे, पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रहारचे संजय देशमुख, राकाँचे अविनाश ठाकरे, शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते यासह प्रशांत कांबळे, जसवीर ठाकूर, सुरेंद्र भिवगडे, मनोज दिगांबरे, शफिक शहा यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित होते.
 
विशेष म्हणजे, यापूर्वी आंदोलनकर्ते प्रदीप डाखोरे यांना २०२१/२२ चा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आता शासनाने तातडीने योग्य दखल घेतली नाही, तर आम्हीसुद्धा कुटुंबीयांसह टॉवरवर चढू, असे प्रदीप डाखोरे यांचे पुत्र ज्ञानेश डाखोरे म्हणाले.