देशातील सर्वात मोठा जीएसटी घोटाळा

७३४ कोटींचे बनावट आयटीसी पैसा वैध करण्यासाठी १३५ बाेगस कंपन्यांची निर्मिती

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |

 

नवी दिल्ली
gst-scam अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रांची विभागीय कार्यालयाने जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घोटाळा प्रकरणाच्या तपासासंदर्भात ज्ञानचंद जयस्वाल आणि राज जयस्वालला बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली आहे. रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात ७३४ कोटींहून अधिक किमतीचे बनावट आयटीसी तयार करण्यात आले होते. आरोपींनी या गुन्ह्यातून मिळालेला पैसा वैध करण्यासाठी १३५ बाेगस कंपन्यांची निर्मिती केली होती.ईडीने ज्ञानचंद जयस्वाल, संजय पारेख आणि इतरांच्या घरे व कार्यालयांशी संबंधित जमशेदपूर आणि कोलकातात चार ठिकाणी शोध आणि जप्ती मोहीम राबवली. यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.
 
 
gst scam
तपासादरम्यान, अनेक गुन्हेगारी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. जमशेदपूर येथील जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला होता. या तपासात बनावट आयटीसी तयार करणे आणि ते हस्तांतरित करण्याशी संबंधित एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला.
 
५,००० कोटींपेक्षा जास्त किमतीची बनावट बिले जारी

तपासात असे उघड झाले की, या सिंडिकेटने १३५ शेल कंपन्यांचे जाळे तयार केले होते. या कंपन्या केवळ कागदावर अस्तित्वात होत्या. कोणत्याही प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बनावट बिले जारी करण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता. या पद्धतीद्वारे सिंडिकेटने ७३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बनावट आयटीसी तयार करुन हस्तांतरित केले. हे बेकायदेशीरपणे मिळवलेले क्रेडिट नंतर विविध नफा कमावणाऱ्या कंपन्यांना कमिशनवर विकले गेले़.

 

कुटुंबातील सदस्यांसह कर्मचाऱ्यांच्या नावावरही कंपन्या

ईडीनुसार, ज्ञान चंद जयस्वाल आणि राज जयस्वाल यांच्या नेतृत्वातील एक गट त्यांच्या कंपन्यांमार्फत या फसव्या आयटीसी घोटाळ्याचा मुख्य लाभार्थी होता. त्यांनी केवळ स्वतःच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरच कंपन्या स्थापन केल्या नाहीत तर त्यांच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावावरही कंपन्या स्थापन केल्या. तसेच ५४.३३ कोटी रुपयांचे फसवे आयटीसी या कंपन्यांमार्फत वळवण्यात आले़ अखेरीस त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईक/कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले.