गुलाबराव महाराज ज्ञान, भक्ती, विवेकाचा संगम

प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांचे प्रतिपादन ‘अमृत मंथन’च्या ज्ञानयज्ञाला दिमाखात प्रारंभ

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
अमरावती
amrut-manthan-knowledge-symposium संत गुलाबराव महाराजांचे जीवन हे प्रतिकूलतेवर मात करून ज्ञानाच्या शिखराकडे वाटचाल करण्याचे उदाहरण आहे. त्यांच्या विचारांमध्ये ज्ञान, भक्ती, विवेक आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वय दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्याकडे केवळ संतचरित्र म्हणून न पाहता, भारतीय ज्ञानपरंपरेचा समृद्ध वैचारिक वारसा म्हणून पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी केले.
 
vyakhyan
 
तुषार भारती मित्र परिवाराच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अमृत मंथन’ तीन दिवसीय व्याख्यानमालेचा शुक्रवारी साईनगर येथील साईरत्न लॉन्स येथे उशुभारंभ झाला. व्याख्यानमालेच्या प्रथम सत्रात ‘प्रज्ञाचक्षु संतश्री गुलाबराव महाराज’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दीपक पिंजरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते तुषार भारती, माजी महापौर चेतन गावंडे, नगरसेवक आशिष अतकरे, लता देशमुख उपस्थित होते. प्रा. देशमुख पुढे म्हणाले, महाराजांना दृष्टी नसतानाही प्रखर प्रज्ञेच्या सामर्थ्यावर अध्यात्म, तत्त्वज्ञान, भक्ती आणि साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले विलक्षण कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास, भक्तीची अनुभूती आणि व्यापक मानवी दृष्टिकोन यामुळे गुलाबराव महाराजांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले. जयंतीनिमत्त महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींना अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन करून आभार मंदार नानोटी यांनी मानले. महाराष्ट्र गीताने सुरुवात व पसायदानाने सांगता झाली. व्याख्यानाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आज राहुल सोलापूरकर
व्याख्यानमालेचे दुसरे सत्र शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता साईरत्न लॉन्स, साईनगर येथे होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व वक्ते राहुल सोलापूरकर हे ‘छत्रपती शिवरायांचे व्यापार आणि व्यवस्थापन शास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.