वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर

घनोटी तुकूम परिसरातील घटना

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
पोंभूर्णा,
herdsman-critically-injured-in-tiger-attack तालुक्यातील घनोटी तुकूम परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार, 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. साईनाथ विठोबा मंडवगडे (50, रा. घनोटी क्रं.1) असे जखमी गुराख्याचे नाव आहे.
 
 
tiger-attack
 
साईनाथ मांडवगडे हे घनोटी तुकूम परिसरातील वनविभागाच्या कक्ष क्रमांक 87 मध्ये गुरे चराईसाठी गेले होते. यावेळी जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. हल्ला परतवून लावण्यासाठी त्यांनी हातात असलेल्या कुर्‍हाडीच्या दांड्याने वाघावर हल्ला चढवल्याने वाघाने तेथून पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मंडवगडे यांना तातडीने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.
 
 
या घटनेमुळे घनोटी तुकूम तसेच परिसरातील गुराखी व शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.