अमरावती,
समृद्धी महामार्गावर मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २ ऑक्टोबर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ७ जणांचा मृत्यू, तर सुमारे २० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात मध्यरात्रीनंतर १२.५० वाजता समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक ९७ येथे घडला.
घनश्याम पाटील, प्रवीण बकाणे, गोलू बादलगवार, ओम गावडे, दताजी खुरसगे, रोशन राऊत, अन्य एक अशी मृतकांची नावे आहेत. मृतक व जखमी अग्नीहोत्री कॉलेज मागील सोमनाथे लेआऊट या एकाच भागातील राहिवासी आहे. सदर परिसरातील दुर्गादेवी मंडळाचे सदस्य शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच-०५-बीएच-५७९३ मधून वर्ध्याकडे परतत होते. यावेळी मागून आलेल्या सीजी-०७-सीजे-८८५५ क्रमांकाच्या ट्रकने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, पिकअपमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमींना सावंगी (वर्धा) येथील मेडिकल कॉलेज तसेच सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. इतर जखमींवर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर पोलिस प्रशासनाने घटनास्थळी आवश्यक कार्यवाही सुरू केली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. समृद्धी महामार्गावरील वाहतूकही सुरळीत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातातील मृतांची व जखमींची ओळख पटली आहे.