चिखली (प्रतिनिधी)
digital-banners "आम्हाला आता नुसती डागडुजी नको, फक्त सलाइन लावून श्वास सुरू ठेवायचा नाही..." अशा भावनिक शब्दांत थेट रस्त्यांचीच व्यथा मांडणारे लक्षवेधी डिजिटल बॅनर सध्या चिखली शहरातील प्रमुख चौकांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. नुकतेच आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी ज्याप्रमाणे बैलजोडी चौकातील इंग्रजकालीन पुलाला नवसंजीवनी दिली, त्याच धर्तीवर जुन्या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठीही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आगळीवेगळी आणि रास्त मागणी चिखलीचे माजी नगरसेवक रामदास देव्हडे, माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ. विमलताई देव्हडे आणि माजी नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी या बॅनर्सच्या माध्यमातून केली आहे.
शहरातील मुख्य चौकांमध्ये देव्हडे परिवाराकडून लावण्यात आलेले हे डिजिटल बॅनर सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. चौकातून ये-जा करणारे नागरिक थांबून हा मजकूर आवर्जून वाचत आहेत. "मी चिखलीचा रस्ता बोलतोय..." या मथळ्याखाली एका रस्त्याच्या भावना यावर व्यक्त करण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन, टेलिफोनच्या तारा आणि वाहनांची वर्दळ यामुळे शहरातील जुन्या रस्त्यांची कशी चाळण झाली आहे, हे यात मांडले आहे. दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली खड्ड्यांत डांबर टाकून रस्त्यांवर केली जाणारी तात्पुरती मलमपट्टी थांबवून आता कायमस्वरूपी नूतनीकरण करण्याची आर्त हाक यातून देण्यात आली आहे.
चिखली शहराला आमदार सौ. श्वेताताई महाले आणि नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासारखे कार्यक्षम लोकप्रतिनिधी लाभले आहेत. काळाच्या ओघात थकलेल्या 'बैलजोडी चौकातील इंग्रजकालीन पुलाचे' आमदार श्वेताताई महाले यांनी नुकतेच यशस्वी पुनरुज्जीवन करून त्याला अक्षरशः जीवदान दिले. या कामामुळे चिखलीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार महाले यांनी मनावर घेतल्यास शहरातील या दुर्लक्षित जुन्या रस्त्यांनाही नक्कीच नवसंजीवनी मिळेल, असा ठाम विश्वास देव्हडे कुटुंबीयांनी या बॅनरमधून व्यक्त केला आहे.
प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी देव्हडे परिवाराने वापरलेली ही 'डिजिटल बॅनर'ची शक्कल चांगलीच प्रभावी ठरताना दिसत आहे. शाळकरी मुलांपासून ते शेतकरी आणि नोकरदारांपर्यंत सर्वांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आता या रस्त्यांच्या पुनरुज्जीवनाची गरज आहे. देव्हडे परिवाराने बॅनरच्या माध्यमातून घातलेल्या या भावनिक सादेला आमदार श्वेताताई महाले कसा आणि किती लवकर प्रतिसाद देतात, याकडे आता संपूर्ण चिखलीकरांचे लक्ष लागून आहे.