गोंदिया
water-supply अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी व सिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे विद्युत देयक थकीत असल्याने १ सप्टेंबरपासून या दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. त्यामुळे या योजनांवर अवलंबून असलेल्या परिसरातील ३० गावांतील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले होते. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून २ ऑक्टोबर रोजी दोन्ही योजनांची विद्युत जोडणी सुरळीत करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.

खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती सुजल बहुउद्देशीय सेवा समिती, नवेगावबांध यांच्यामार्फत, तर सिरेगाव ८ गावे संयुक्त पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती संबंधित संयुक्त पाणीपुरवठा मंडळामार्फत करण्यात येत होती. आतापर्यंत या योजनांची देखभाल-दुरुस्ती तसेच विद्युत देयकांचा भरणा संबंधित मंडळामार्फत करण्यात येत होता. मात्र, विद्युत देयक भरण्यासाठी मंडळ असमर्थ ठरल्याने दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद करण्याची वेळ आली होती. त्यामुळे खांबी, सिरेगाव तसेच परिसरातील सुमारे ३० गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन जि. प. अध्यक्ष भेंडारकर यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घालत संबंधित सरपंच, पाणीपुरवठा मंडळाचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
पाणीपुरवठा योजना दीर्घकाळ बंद राहिल्यास नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्युत देयकाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. भेंडारकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने विशेष बाब म्हणून विद्युत देयक भरण्याची कार्यवाही केली. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी खांबी व सिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची विद्युत जोडणी नियमित करून दोन्ही योजना पूर्ववत सुरू करण्यात आल्या. या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या ३० गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. योजना सुरू करण्यासाठी आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले , जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, माजी जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, जि.प. सभापती पौर्णिमा ढेंगे, जि. प. सदस्य रचना गहाणे , यशवंत गणवीर, पं.स. सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते व संपुर्ण सभागृह यांचे सहकार्य लाभल्याचे भेंडारकर यांनी सांगितले.
पिण्याचे पाण्यासाठी कोणत्याही नागरिकाला इतरत्र भटकण्याची वेळ येऊ नये, तसेच सर्व नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा परिषद स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. खांबी व सिरेगाव पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकारी, सरपंच व पाणीपुरवठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. योजना पूर्ववत सुरू झाल्याने संबंधित ३० गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला प्रशासनाच्या समन्वयातून प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
- लायकराम भेंडारकर, अध्यक्ष, जि. प. गोंदिया