जखमी पायलटची धाडसी ‘लँडिंग’!

मोदींनी कॅप्टन स्मित माछर यांच्या शौर्याचे केले कौतुक

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
captain-smit-machhar फ्लाय दुबईच्या विमानातील संकटाच्या प्रसंगी धैर्य आणि प्रसंगावधान दाखवून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित माछर यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या संवादात कॅप्टन माछर यांनी त्या घटनेदरम्यान आलेला अनुभव पंतप्रधानांसोबत शेअर केला. गंभीर परिस्थितीतही त्यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि संयमाचे मोदी यांनी कौतुक केले. तसेच त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
captain-smit-machhar
 
पंतप्रधान मोदी यांनी संवादादरम्यान कॅप्टन माछर यांना त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. त्यावर माछर यांनी आता सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. यावेळी मोदी यांनी संपूर्ण देश त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले. महामृत्युंजय मंत्राचा जप केला जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी माछर यांच्या धैर्याचे कौतुक केले. अत्यंत कमी वेळेत संयम राखून आणि योग्य निर्णय घेत त्यांनी अनेकांचे प्राण वाचवल्याचे मोदी यांनी सांगितले. भारताची ओळख जीव घेणारा नव्हे, तर जीव वाचवणारा देश अशी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
घटनेनंतर कॅप्टन स्मित माछर यांना सौदी अरेबियातील तबूक येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अबू धाबी येथे हलवण्यात आले. यूएईमधील भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी रुग्णालयात जाऊन कॅप्टन माछर आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन माछर यांची प्रकृती उत्तम असून ते वेगाने बरे होत आहेत. त्यांच्या उपचारासाठी दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही कॅप्टन माछर यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. अबू धाबीतील भारतीय दूतावास आणि दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे मंत्रालयाने सांगितले.
 
दरम्यान, बुधवारी दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या एफझेड१०७३ या विमानाने आपत्कालीन संकेत दिला होता. त्यावेळी विमान सुमारे ३४ हजार फूट उंचीवर होते आणि त्यानंतर ते वेगाने खाली आले. सौदी अरेबियातील तबूक येथील प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअजीज विमानतळाकडे वळवण्यापूर्वी विमानाची उंची १७ हजार फुटांपेक्षा अधिक खाली आली होती. विमानात २७ मुलांसह एकूण १७४ प्रवासी होते. कॉकपिटमध्ये सह-वैमानिकाने कॅप्टन माछर यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याचे सांगण्यात आले. मात्र, जखमी अवस्थेतही माछर यांनी प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे उतरवले आणि विमानातील सर्व १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले.