आदिशक्तीच्या जागरासाठी मूर्तिकारांची रात्रंदिवस लगबग

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
पराग मगर

नागपूर,
nagpur-news गणेशोत्सवाची सांगता होताच आता शहराला नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. या पृष्ठभूमीवर शहरातील दुर्गामूर्ती निर्मितीच्या कामाला वेग आला असून, चितारओळीसह विविध भागांतील मूर्तिकार दिवसरात्र आदिशक्तीच्या मूर्तींना आकार देण्यात व्यस्त आहेत. कुठे सिंहावर आरूढ दुर्गामातेचे रूप साकारले जात आहे, तर कुठे महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीला अंतिम स्वरूप दिले जात आहे.

nagpur-news
नागपूरचे वैशिष्ट्य असलेल्या भव्य, देखण्या आणि कलात्मक दुर्गामूर्तींची परंपरा यंदाही कायम आहे. सार्वजनिक मंडळांच्या मागणीनुसार ३ फुटांपासून तब्बल १५ फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. संपूर्ण मातीपासून पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यावर अनेक मूर्तिकारांनी भर दिला आहे. दुर्गामूर्ती निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या चितारओळी परिसरात सध्या मूर्तिकारांची मोठी लगबग दिसून येत आहे. मूर्तिकारांच्या माहितीनुसार, शहरात दीडशेहून अधिक पारंपरिक मूर्तिकार दुर्गामूर्ती घडविण्यात व्यस्त आहेत. चितारओळीसह लालगंज, पाचपावली, टिमकी, बुधवारी, बाळाभाऊपेठ, मंगळवारी, गाडीखाना, महाल, शुक्रवारी, कुंभारपुरा, नंदनवन आणि जगनाडे चौक आदी भागांतील कार्यशाळांमध्ये मूर्ती निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
मूर्तीचे मुखमंडल, डोळ्यांतील भाव, हातातील आयुधे, सिंहाची ठेवण तसेच महिषासुराच्या प्रतिमेतील बारकावे यावर मूर्तिकार विशेष मेहनत घेत आहेत. मूर्तीसह रंगकाम, अलंकार आणि अंतिम सजावटीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कारागिरांचे कसब पणाला लागले आहे. पिढ्यानपिढ्या जपलेल्या पारंपरिक कलेला आधुनिक कलात्मकतेची जोड देत यंदाच्या मूर्ती साकारल्या जात आहेत.
पिढीजात कलेला नव्या पिढीची साथ
नागपुरातील पारंपरिक मूर्तिकलेची ओळख जपण्यात मूर्तिकारांचा मोठा वाटा आहे. पूर्वजांकडून मिळालेली कला पुढील पिढीकडे हस्तांतरित होत असताना नव्या कल्पना आणि तंत्रज्ञानाचीही त्यात भर पडत आहे. पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तींवर मूर्तिकारांचा अधिक भर आहे.
 
बंगाली दुर्गामूर्तींचे काम अंतिम टप्प्यात
नागपुरातील बंगाली समाजाकडूनही दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी बंगालचे मूर्तिकार सुभाष पाल दरवर्षी सात ते आठ सहकाऱ्यांसह नागपुरात येतात. धंतोली येथील बंगाली असोसिएशनच्या इमारतीत दुर्गामूर्ती साकारण्याचे काम सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. बंगाली दुर्गामूर्तींची ठेवण आणि कलाकुसर वेगळी असते. त्यासाठी लागणारी विशिष्ट माती, रंग आणि अन्य साहित्यही हे मूर्तिकार बंगालमधूनच घेऊन येतात. बंगालमधील माती आणि नागपुरातील मातीतील फरक अधोरेखित करताना, ‘यहाँ की मिट्टीमें गंगा किनारे वाली बात नहीं’, असे सुभाष पाल नेहमी सांगतात. त्यामुळे बंगाली परंपरेनुसार दुर्गामूर्ती घडविण्याची प्रक्रिया नागपुरातही विशेष आकर्षण ठरत आहे.