ऑक्टोबर 'हिट'च्या लाटेवर विजांचा पाऊस स्वार!

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
मुंबई,
October heat and lightning यंदाच्या हंगामात राज्यात पावसाची स्थिती तशी कमीच राहिली असून, सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच पावसाने हळूहळू माघार घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या परतीसाठी पोषक असे हवामान तयार होत आहे. उत्तर म्यानमार आणि अग्नेय बांगलादेशच्या परिसरात एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, नैऋत्य मोसमी वारे आता राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या बहुतांश भागांतून तसेच गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांतून यशस्वीपणे परतले आहेत. उद्या ३ ऑक्टोबरपासून देशाच्या आणखी काही भागांतून मान्सून पूर्णपणे परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दक्षिण कर्नाटकपासून मन्नारच्या आखातापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा एक कमी दाबाचा पट्टा सध्या विस्तारलेला आहे.

23r545 
 
 
मान्सूनचा परतीचा हा प्रवास सुरू असतानाच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित भागात मात्र ढगाळ हवामान राहून उन-सावल्यांच्या खेळात उन्हाचा चटका आणि असह्य उकाडा वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत १ ते ४ मिलीमीटर हलक्या पावसाची शक्यता आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात २ ते ५ ऑक्टोबरदरम्यान १ ते २ मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज असून ६ ऑक्टोबर रोजी मात्र आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यात केवळ आज २ ऑक्टोबर रोजी १ मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवली असून, आगामी ३ ते ६ ऑक्टोबर या काळात मात्र जिल्ह्यात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही.