पन्ना,
Panna diamondमध्यप्रदेशातील पन्ना हे ठिकाण पुन्हा एकदा आपल्या मौल्यवान हिऱ्यांमुळे चर्चेत आहे. उत्तरप्रदेशातील एका महिलेचे नशीब उजळले आहे़ तिला एकाच खाणीतून एकाच वेळी चार हिरे सापडले. या चारही हिऱ्यांचे वजन पाच कॅरेटपेक्षा जास्त असून अंदाजित मूल्य सुमारे १० लाख रुपये आहे. या महिलेने हे सर्व हिरे ‘पन्ना डायमंड ऑफिस’मध्ये जमा केले आहेत.
उत्तरप्रदेशातील झाशी येथील रहिवासी गुड्डी श्रीवास यांनी हिऱ्यांच्या शोधासाठी पन्नाच्या सरकोहा परिसरात एक खाजगी खाण खोदली होती. दीर्घ आणि अथक प्रयत्नांनंतर गुड्डी श्रीवास यांना अखेर ते यश मिळाले़ खाणीत काम करत असताना गुड्डी श्रीवास यांना चार हिरे सापडले. या चारही हिऱ्यांचे एकूण वजन पाच कॅरेटपेक्षा जास्त आहे. गुड्डी श्रीवासने ते नियमांनुसार पन्ना येथील हिऱ्यांच्या कार्यालयात जमा केले. हे हिरे आता आगामी लिलावात विक्रीसाठी ठेवले जातील.
गुड्डी श्रीवास सांगतात की, त्या झाशीच्या रहिवासी असून, पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीत काम करत होत्या. एकाच वेळी चार हिरे सापडल्याने त्या खूप आनंदी आहेत. लिलावातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्या आपल्या मुलांचे शिक्षण आणि घरगुती गरजांसाठी करतील.
पन्नाची भूमी कोणाचे नशीब कधी बदलेल हे सांगणे कठीण आहे. गुड्डी श्रीवासला सरकोहा येथील एका खाजगी खाणीत सापडलेले चार हिरे याच आशेची कहाणी सांगतात. आता सगळ्यांच्या नजरा या हिऱ्यांच्या लिलावावर लागल्या आहेत, जिथे त्यांची खरी किंमत ठरणार आहे.