चंद्रपुरातील कुंटणखान्यावर धाड , दोन महिलांची सुटका

आरोपी दोन महिलांना अटक

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर,
raid-on-a-brothel-in-chandrapur शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसरात एका घरी सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी देहविक्रीचा व्यवसाय चालविणार्‍या दोन आरोपी महिलांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 1 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
 
 
raid-on-a-brothel-in-chandrapur
 
येथील अष्टभुजा वॉर्डातील लव्ह इंडिया चर्चच्या मागील परिसरातील एका घरामध्ये महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या महितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी त्या ठिकाणी बनावट गिर्‍हाईक पाठविले. त्यानंतर महिला पंच, सामाजिक कार्यकर्त्या व अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष येथील चमूसह धाड टाकली. यावेळी मुस्कान शफीक शेख (40, रा. रॉयनगर, लव्ह इंडिया चर्चजवळ, अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर, मुळ रा. उसगाव, ता. घुग्घूस, जि. चंद्रपूर) व रेशमा उर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख (45, रा. टॉवर टेकडी जुनोना चौक, अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर) या संगनमत करून पीडित महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी भ्रमणध्वनी, रोख रक्कम, कंडोम बॉक्स असा एकूण 22 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी महिलांना अटक केली आहे. तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपीविरूध्द रामनगर पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3, 4, 5, 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.
 
 
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्‍वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक संतोष निंभोरकर व सुनील गौरकार, अंमलदार किशोर वैरागडे, महिला अंमलदार छाया निकोडे, निराशा तितरे, विजयमाला वाघमारे, अपर्णा मानकर आदींनी केली.