जुनी मंगळवारीत जावेद मुर्गाच्या जुगार अड्ड्यावर छापा

१७,९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
raid-on-javed-murgas-gambling-den जुनी मंगळवारी परिसरातील ढीवर मोहल्ल्यात सुरू असलेल्या जावेद मुर्गाच्या जुगार अड्ड्यावर लकडगंज पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराच्या साहित्यासह एकूण १७ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत. जावेद मुर्गा हा कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळवित असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो जुगार अड्डासुद्धा भरवत होता. त्याची गुन्हे शाखेच्या पथकातील काही पोलिस कर्मचाऱ्यांशी "अर्थपूर्ण मैत्री" असल्याची चर्चा आहे.

raid-on-javed-murgas-gambling-den  
बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास लकडगंजचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनात एक पथक परिसरात गस्तीवर होते. जुनी मंगळवारी येथील ढीवर मोहल्ल्यात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सेवन रमेश चौधरी (३०, रा. हत्ती नाला, जुनी मंगळवारी) आणि गणेश हरीश धांडे (२०, रा. जुनी मंगळवारी) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तीन आरोपींचा शोध सुरू
छाप्यादरम्यान जावेद ऊर्फ मुर्गा मो. शुकूर (४०, रा. नवाबपुरा, कोतवाली), राजेश ऊर्फ भुऱ्या हरीभाऊ करणुके (३८, रा. जुनी मंगळवारी, धीवरपुरा) आणि खुशाल ऊर्फ मिट्टू हरिश्चंद्र पौनीकर (३१, रा. जुनी मंगळवारी, धीवरपुरा) हे तिघे पसार झाले. त्यांचा शोध सुरु आहे. फरार आरोपी राजेश ऊर्फ भुऱ्या आणि खुशाल ऊर्फ मिट्टू यांच्याविरुद्ध यापूर्वीही जुगार तसेच अन्य प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहेत. परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर लक्ष केंद्रित करून लकडगंज पोलिसांनी ही कारवाई केली. फरार आरोपींचा शोध सुरू असून, अवैध जुगार आणि अन्य बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.