प्रणव सातोकर
नागपूर
wrestling-arenas nmc शहरातील पारंपरिक आखाड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना, नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या मोजक्या आखाड्यांचीही दुरवस्था झाली आहे. सदर येथील स्व. रामराव अमृते आखाडा याची प्रचिती देत आहे. ज्या आखाड्याने नागपूरसह विदर्भाला अनेक नामवंत मल्ल दिले, त्याच आखाड्यात आज मूलभूत सुविधांची वानवा आहे. विशेष म्हणजे मनपाच्या क्रीडा विभागाकडून या आखाड्यासाठी दोन लाख रुपयांचा निधी ठेवण्यात आल्याची माहिती असतानाही प्रत्यक्ष आखाड्याची अवस्था दयनीय असल्याचे खेळाडू आणि स्थानिकांचे म्हणणे आहे.
आखाड्यात कुस्तीची योग्य माती उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. मातीच्या जागेवर नर्सरीसाठी वापरली जाणारी माती टाकण्यात आल्याचे वस्ताद श्रीराम पेंदाम यांनी सांगितले. या मातीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते. सराव करताना ही धूळ नाकातोंडात जात असून, खेळाडूंना श्वसनाचा त्रास तसेच शारीरिक दुखापतींचा सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले.
व्यायामाची अनेक साधनेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. तुटलेल्या साहित्यामुळे खेळाडूंना दुखापत झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पैलवान घडविणाऱ्या आखाड्यातच खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापौर केसरी, विदर्भ केसरी घडविणाऱ्या आखाड्याची ही अवस्था!
या आखाड्याने नागपूर आणि विदर्भाच्या कुस्ती क्षेत्राला अनेक मल्ल दिले आहेत. वीरबहादूर आणि निलेश राऊत यांनी महापौर केसरीचा किताब पटकावला, तर नूर बादशाह हे विदर्भ केसरी स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरल्याचे येथील खेळाडू सांगतात. आजही सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील युवकांसाठी हा आखाडा कुस्तीचे प्रशिक्षण घेण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. हजारीपहाड, सेमिनरी हिल्स, वायूसेना नगर, काटोल रोड यांसह विविध भागांतून युवक येथे सरावासाठी येतात. सध्या सुमारे १५ पैलवान नियमितपणे येथे कुस्तीची तालीम घेत आहेत. मात्र मनपाकडून पुरेशा सुविधा मिळत नसल्याने रंगरंगोटी, साहित्याची दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामांसाठी खेळाडू व स्थानिकांनी वर्गणी गोळा करून खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे.
सुरक्षारक्षक नाही; साहित्य चोरीला
आखाड्याला सुरक्षारक्षक नसल्यामुळे येथील काही साहित्य चोरीला गेल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. मनपाने उपलब्ध करून दिलेला वॉटर फिल्टरदेखील खराब अवस्थेत असून, त्यातून सतत पाणी गळत असल्याची तक्रार आहे.
ना व्यवस्थित लाईट , ना स्वच्छतागृह, ना सुरक्षारक्षक आणि आखाड्याच्या नावाचा साधा फलकही नाही ! अशी परिस्थिती असल्याचे खेळाडू सांगतात.
आमदार निधीतून कामे; मनपा नेमके करतेय काय?
स्थानिक नागरिक आणि खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, आखाड्यातील काही कामे आमदार विकास ठाकरे यांच्या निधीतून झाली आहेत. मातीची व्यवस्था मात्र मनपाच्या निधीतून झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मनपाच्या अखत्यारितील या आखाड्याच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘लंगोट घालून मनपावर मोर्चा काढू’
मनपाच्या दुर्लक्षाबाबत वस्ताद श्रीराम पेंदाम आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी आहे. “महानगरपालिकेने अशीच उदासीनता कायम ठेवली तर लंगोट घालून मनपावर मोर्चा काढावा लागेल,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला. नागपूरमध्ये कुस्तीपटूंची संख्या आधीच कमी होत असताना, उरलेल्या आखाड्यांची अशी दुरवस्था होत असेल तर नवीन मल्ल घडविण्याचे आव्हान अधिक गंभीर होणार आहे. केवळ कागदावर निधी आणि कारवाई दाखविण्याऐवजी मनपाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आखाड्यात येऊन पाहणी करावी, अशी मागणी खेळाडूंकडून होत आहे.
आम्ही या आखाड्याची रंगरंगोटी केली असून, खेळाडूंसाठी ओटा तयार करून दिला आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलरचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी शहरातील ७५ ग्राउंड विकसित करण्याचा आमचा मानस आहे. पुढील वर्षी उर्वरित आखाड्यांच्या विकासाचे काम हाती घेण्यात येईल.”
— दर्शनी धवड, क्रीडा सभापती, नागपूर महानगरपालिका