अफवांची ‘वा...वा’!

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
वेध
रेवती जोशी-अंधारे
९२२३७००२७७
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनानंतर, ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ या उक्तीचा प्रभाव वाढला. विद्यार्थ्यांना हाताशी धरून देशात अराजक माजविता येते आणि ही गर्दी पैशांशिवाय गोळा होते, हे ज्ञान राजकीय पक्षांना मिळाले. तर, संतापाचा सन्मान होतो आणि कायदेशीर कारवाईची भिती नसते, हे धडे युवा पिढीने गिरवून पक्के केले आहेत. पंजाबमधील दोन विद्यापीठांमध्ये विद्यार्थी आंदोलनाचे हिंसक वळण ही भयावह भविष्याची नांदी आहे. व्हॉट्सॲपवरचा व्हायरल मेसेज, इन्स्टाग्रामवरची रील, एक अर्धवट गोष्ट आणि त्यातून पेटलेला हा युवा जमाव ज्याला सत्य वगैरे जाणून घेण्यात रस नाही. अफवांची ‘वा...वा’ करणाऱ्या या वृत्तीचा वेध घेऊ या!
 
 
ru,ors
 
चितकारा विद्यापीठात हॉस्टेलमधील मुलींनी केलेल्या एका हॉरर प्रँकपासून सुरू झालेली गोष्ट काही तासांत मृत विद्यार्थिनी, बेपत्ता मुलगी आणि शेवटी हॉस्टेलच्या कॉरिडॉरमध्ये फिरणाऱ्या भुतापर्यंत पोहोचली. होस्टेलमध्ये एक रुग्णवाहिका येणे आणि एका वडिलांचे आपल्या मुलीला भेटण्यासाठी येणे या दोन साध्या घटनांमधून सोशल मीडियाने दोन मृत मुली निर्माण केल्या, मग त्या बेपत्ता झाल्या, मग त्यातील एक भूत झाली. कहर म्हणजे भुताचा व्हिडिओही तयार झाला. मग युवाशक्ती जागृत झाली, आंदोलन उभे झाले, काचा फुटल्या, नुकसान झाले आणि वातावरण पेटले. पण, कोणत्याच विद्यार्थ्याचे कुटुंबीय दाद मागायला आले नाही, पोलिसांकडेही गेले नाहीत. काहीच तिखटमीठ नसलेल्या या सत्याला व्हायरल करणार तरी कोण?
 
 
 
रील्स सांगतात की, विद्यार्थिनी मेली तर ती मेलीच आहे. पोलिस म्हणतात, नाही मेली तर पोलिस ‘त्यांना’ मिळाले आहेत. ती मुलगी दुसऱ्या दिवशी वर्गात आली तर ती भूत आहे. एखादा व्हिडिओ पुरावा निघाला नाही तर तो ‘स्क्रिप्टेड’! दुसऱ्या दिवशीपासून लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात गोंधळ सुरू झाला. विद्यार्थिनीवर सामूहीक बलात्कार आणि आत्महत्या, अशी गंभीर अफवा! काही तासांत कथा, मग संताप आणि आंदोलन! राष्ट्रीय महामार्ग बंद, वाहनांचे नुकसान आणि जाळपोळ! विद्यापीठ १५ दिवस बंद करून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मिशन अराजक फत्ते झाले. पण, पीडित मुलगी कुठे आहे? तिचे कुटुंब-मित्र कुठे आहेत? घटना घडली असेल तर पुरावा कुठे आहे? हे प्रश्न कायम! प्रश्न विचारणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनांचा अपमान नाही. उलट, जर घटना घडली असेल तर, सत्य बाहेर आलेच पाहिजे आणि जर घटना घडलीच नसेल, तर अफवा पसरवणाऱ्यांची जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे. सत्य महत्त्वाचे आहे, संताप नाही.
 
 
 
अफवा अचानक निर्माणही होत नाहीत. एक ‘चांगली’ अफवा निर्माण होण्यासाठी भीती लागते, अपूर्ण माहिती लागते, पूर्वग्रह लागतो आणि एक स्मार्टफोन लागतो. कधी या अफवा धोकादायक होऊन निरपराधांचे जीव घेतात. अफवा फक्त खोटी माहिती नसते. ती भीतीला दिशा, पूर्वग्रहाला शस्त्र आणि जमावाला लक्ष्य देते. २०१८ मध्ये ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाने सोशल मीडियावरील अफवांच्या वेगाचे भयावह चित्र दाखवले. अभ्यासकांनी ट्विटरवरील सुमारे १.२६ लाख बातम्यांचा आणि त्यांना शेअर करणाऱ्या लाखो वापरकर्त्यांचा अभ्यास केला. निष्कर्ष स्पष्ट होता. खोटी माहिती सत्यापेक्षा अधिक वेगाने आणि दूरवर पोहोचते. याचे कारण बॉट्स नाही तर आपण स्वतः आहोत. खोटे अधिक सनसनाटी, नवे आणि धक्कादायक असल्यामुळे ते पुढे पाठवावेसे वाटते. सत्याला अल्गोरिदमची मदत मिळत नाही पण, अफवेला मिळते. अफवांना ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी रीट्वीट केले, हे याच अहवालातून स्पष्ट झाले. विद्यार्थिनीवर अत्याचार झाला असेल तर दोषींना शिक्षा झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत उत्तरे दिली पाहिजेत. प्रशासन गप्प राहिले तर निर्माण झालेली पोकळी अफवा भरून काढते. या सगळ्यात राजकारणाची सरमिसळ आणखी धोकादायक! राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करतात, विरोधक सरकारवर करतात, नागरिक पोलिसांवर आणि विद्यार्थी विद्यापीठांवर आरोप करतात. पण, मूळ प्रश्न कायम राहतात.
 
 
 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अधिकार नाकारता येत नाही आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. पण, हिंसाचाराला कायमच ‘तरुणांचा संताप’ म्हणून माफही केले जाऊ शकत नाही. विरोधाभास असा की, चितकारा आणि लव्हली या दोन्ही प्रकरणांमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा नोंदविला जाणार नाही. या पिढीने पाहिले आहे की, रस्त्यावरचा संताप सरकारला निर्णय बदलायला भाग पाडू शकतो. काहींनी पाहिले आहे की, मोठा जमाव प्रशासनावर दबाव आणू शकतो. राजकीय पक्षांनी पाहिले आहे की तरुणांची ऊर्जा मोठ्या आंदोलनात बदलू शकते आणि सोशल मीडियाने दाखवून दिले आहे की एक खोटी बातमी काही तासांत लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. हे सगळे एकत्र आले की मोठ्या कटाची गरज नसते. फक्त एक ठिणगी पुरेशी असते आणि आपल्या देशात अशा ‘हौशी’ ठिणग्यांची कमतरता नसतेच कधी! आज गरज संताप थांबवण्याची नाही तर संतापाला सत्याची साथ देण्याची आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याची नाही पण, विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याची आहे. अफवा केवळ मोबाईलमध्ये नसतात. त्या आपल्या मनातही असतात. आणि म्हणूनच आजचे सर्वांत अस्वस्थ करणारे सत्य हेच आहे की, अफवा पसरत नाही, आपण त्या पसरवतो.