नवी दिल्ली,
Section 163 imposed in New Delhi २ ऑक्टोबर २०२६ रोजी राजधानी दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर येत असून सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोची ११ स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) दिलेल्या माहितीनुसार, जनपथ, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट, राजीव चौक, सेवा तीर्थ, मंडी हाऊस, लोक कल्याण मार्ग, आयएनए, चावडी बाजार, रामकृष्ण आश्रम मार्ग आणि नवी दिल्ली या मेट्रो स्थानकांवर प्रवाशांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी राजीव चौक, मंडी हाऊस, नवी दिल्ली आणि सेंट्रल सेक्रेटरीएट या स्थानकांवर इंटरचेंज सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली परिसरात भारतीय दंड संहितेच्या कलम १६३ अंतर्गत कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या नियमांनुसार पूर्व लेखी परवानगीशिवाय नवी दिल्ली जिल्ह्यात पाच किंवा अधिक लोकांच्या सार्वजनिक सभा किंवा मेळावे भरवण्यास मनाई करण्यात आली असून मिरवणुका, निदर्शने, धरणे, घोषणाबाजी किंवा भाषणे देण्यावरही पूर्ण प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच या भागात शस्त्रे, बॅनर, फलक, काठ्या, तलवारी, सळ्या, दगड किंवा अशाच प्रकारच्या इतर कोणत्याही वस्तू बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम २२३ आणि कायद्याच्या इतर लागू तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्ली वाहतूक पोलिसांनी देखील नागरिकांसाठी विशेष वाहतूक सूचना जारी केली आहे. आज जंतर मंतर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात विविध निर्बंध व नियंत्रित वाहतूक लागू असल्याने वाहनचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो. कनॉट प्लेस, पटेल चौक, जीपीओ, टॉल्स्टॉय मार्ग, जंतर मंतर रोड, पार्लमेंट स्ट्रीट आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक वळवण्यात आली असून नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी बाधित मार्ग टाळावेत, आपल्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करावे आणि प्रवासासाठी काही वेळ अतिरिक्त हातात ठेवावा असा सल्ला दिला आहे. प्रवाशांनी शक्य असेल तिथे पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच संयम बाळगून वाहतूक नियमांचे पालन करत परिसरात तैनात असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे.