नागपूर (सावनेर)
Senior Citizens Day दिवाणी न्यायालय, सावनेर येथे तालुका विधी सेवा समिती आणि तालुका बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, पक्षकार तसेच अधिवक्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी अधिवक्ता आर. एस. मानकर आणि अधिवक्ता ए. जे. मुलमुले यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. जे. मोहोड यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रामाणिकपणे निराकरण करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला सह दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. ठाकूर, तालुका वकील संघाचे सचिव ए. वाय. निंबाळकर उपस्थित होते. सूत्रसंचालन अधिवक्ता सी. जी. पिसे यांनी केले, तर आभार अधिवक्ता पी. एम. माहुलकर यांनी मानले.
सौजन्य:अनिल सोलंकी,संपर्क मित्र