अनिल कांबळे
नागपूर,
sexual-harassment-of-a-minor-girl अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातून जामिनावर कारागृहातून सुटल्यानंतर तरुणाने पुन्हा त्याच मुलीचा पुन्हा पाठलाग करून तिचा लैंगिक छळ केला. आरोपीने मुलीला अश्लील संदेश पाठवून तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी सुनील बागडे (वय २१) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पॉक्सो कायद्यान्वये नवीन गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीची आरोपीशी स्नॅपचॅटच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची पाटणकर चौकात भेट झाली. पुढे मुलगी आरोपीच्या घरीही गेली होती. याचदरम्यान आरोपीने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी कपिलनगर पोलिस ठाण्यात बागडेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आरोपीने पुन्हा मुलीशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तो तिला वारंवार फोन आणि संदेश पाठवत होता. तसेच तिचा पाठलाग करून अश्लील संदेश पाठविणे आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ३० सप्टेंबर रोजी आरोपी मुलीच्या घराबाहेर पोहोचला. त्याला पाहून मुलीने आईला माहिती दिली. त्यानंतर आईने घराबाहेर येऊन आरोपीला जाब विचारला. यावेळी आरोपीने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर पीडित मुलीने जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम २९६, ७८, ७९ आणि ३५१(३) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.