बुलढाणा
amravati teachers' constituency शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सातत्याने शिक्षक भारती आवाज उठवत आली आहे. सध्या शिक्षक ज्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत, त्या समस्या सोडवण्याचे सामर्थ्य केवळ संघटनेतच आहे. यापुढेही शिक्षकांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासनांपुरते न राहता त्यासाठी अविरत संघर्ष करण्याची भूमिका शिक्षक भारतीने घेतली आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारतीचाच शिक्षकांपुढील सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन अमरावती शिक्षक मतदारसंघातील शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार सुरेश देवकर यांनी केले. ५ ऑटोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगत शिक्षकांनी आपल्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून शिक्षक भारतीलाच पहिल्या पसंतीक्रमाचे मत द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दि. २ ऑटोबर रोजी शिक्षक भारती संघटनेचे अधिकृत उमेदवार सुरेश देवकर यांनी बुलढाणा येथील पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिक्षक भारतीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक खोरखेडे, डी.डी. वायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सुरेश देवकर म्हणाले की, अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने होत असल्याने शिक्षकांनी मतदानाबाबत संभ्रम बाळगण्याची गरज नाही. बुलढाण्यातील सर्व शिक्षकांना आपल्या पसंतीक्रमानुसार मत देण्याचा अधिकार आहे. मतदारांनी दूरदृष्टी असलेला आणि पाचही जिल्ह्यात पोहोचलेला तसेच सर्वसमावेशक काम करू शकणारा योग्य उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे.
जुनी पेन्शन योजना, सुमारे २६ हजार शिक्षकांचा पेन्शनशी संबंधित प्रश्न तसेच कमी टक्केवारीवर निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सुरेश देवकर यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनाचे प्रयत्न अपुरे पडल्याची खंत व्यक्त करत, निवडून आल्यानंतर सामान्य शिक्षकांचा आवाज शासन दरबारी बुलंदपणे पोहोचविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कला व क्रीडा शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या शिक्षकांच्या सेवा कायमस्वरूपी नसल्याने त्यांना स्थैर्य मिळत नाही. कला, क्रीडा, साहित्य आणि शारीरिक विकासातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते. त्यामुळे कला-क्रीडा शिक्षकांना कायम सेवेत घेण्यासोबतच विज्ञान परिचरांची कमी झालेली पदेही पुन्हा भरण्याची मागणीही सुरेश देवकर यांनी केली.