नंदनवनमध्ये मध्यरात्री चालत्या कारमधून गोळीबार; गुंडाची दहशत

आरोपीचे साथीदारांसह शहराबाहेर पलायन

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
nandanvan शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाच्या संघर्षातून नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्री चालत्या कारमधून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. महाल परिसरातील कुख्यात गुंड राकेश मोहिते याने प्रतिस्पर्धी गुन्हेगाराला धमकावण्यासाठी हा गोळीबार केल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी आपल्या साथीदारांसह शहरातून पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
shots-fire
पोलिस सूत्रांनुसार, बुधवारी रात्री उशिरापर्यंत राकेश मोहिते आणि त्याचे काही साथीदार एका बारमध्ये मद्यपान करीत होते. त्यानंतर ते कारने हसनबाग परिसरात पोहोचले. डीएल मोटर्सजवळील उड्डाणपुलाच्या दिशेने जात असताना मोहितेने चालत्या कारमधून अनेक गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. मध्यरात्रीची वेळ असली तरी परिसरात नागरिकांची वर्दळ होती. अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांचे पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपायुक्त रश्मिता राव आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांनीही पथकासह घटनास्थळाची पाहणी करून प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली.
सीसीटीव्ही फुटेजमधून टोळीचा माग
पोलिसांनी घटनास्थळासह आरोपींनी वापरलेल्या संभाव्य मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. बारमधील चित्रणही तपासण्यात आले. या तपासातून मोहिते टोळीचा सहभाग असल्याचा संशय बळावल्याचे सूत्रांनी सांगितले. गोळीबाराच्या वेळी कारमध्ये चार ते पाच जण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मोहिते आणि हसनबाग परिसरातील एका गुन्हेगारामध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे समजते. याच वादातून प्रतिस्पर्ध्याला धाक दाखविण्यासाठी मोहितेने हवेत गोळीबार केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
चंद्रपूरच्या दिशेने पलायन
गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपींनी पहाटेच्या सुमारास चंद्रपूरच्या दिशेने पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेथील कोळसा आणि रेती माफियाशी संबंधित व्यक्तींकडे त्यांनी आश्रय घेतल्याचा संशय आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. गोळीबारात सहभागी असलेल्यांचा शोध घेऊन लवकरच अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्वाच्या संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.