अध्र्या तासाच्या अंतरात सहा जणांना दिला अखेरचा निरोप; मोहल्ल्यातच आक्रोश

कुणी छोटा दुकानदार, मजूर तर कुणी भाजी विक्रता

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
वर्धा,
wailing-fills-the-neighborhood दुर्गोत्सवाचे नऊ दिवस आईच्या सेवेत घालण्याचा निर्धार करून शेगाव येथुन दुर्गामातेला आणण्यासाठी निघालेल्या माताभक्तांवर काळाने घाला घातला. एकाच परिसरातील ७ जणांच्या मृत्यूने सोमनाथे लेआऊटमध्ये आज चुल पेटली नाही. दुपाली अडीचनंतर दर अध्र्या तासाच्या अंतरात ७ जणांची अन्त्ययात्रा निघाली. स्थानिक स्मशानभूमीत ७ जणांना अन्त्यसंस्कार करण्यात आले. रुग्णालयातून घरी शेवटचे दर्शन आणि प्रेतयात्रा अन्त्यसंस्कारासाठी निघाताना मोहल्ल्यातच आक्रोश पाहायाला मिळाला.
 
 
wailing-fills-the-neighborhood
 
स्थानिक सोमनाथे लेआऊटमधील दुर्गादेवी आणण्यासाठी गेलेल्यांना घरी परत येताना यमदुताने रस्त्यात गाठले. यात सात जणांचा मृत्यू झाला. निधन झालेल्यांमध्ये दत्ता कुडसंगे भाजी विक्रेता, गोलू बादलमवार मजुरी, घनश्याम पाटील यांचे कटींगचे छोटे दुकान, मुनेश्वर ढोले राजकाम, प्रवीण बकाने भाजी विक्रेता तर रोषन राऊत हा किरकोळ वायरिंगचे कामं करतो. जवळपास सर्वच घरातील कामवते व्यक्ती आहेत. अपघाताची माहिती सकाळी १० वाजेपर्यंत मृतकांच्या घरी देण्यात आली नाही. परंतु, परिसरात नेहमी पेक्षा जास्त वर्दळ दिसल्याने घरच्यांमध्येही शंकेची पाल चुकचुकली. दुपारी २ वाजताच्या सुमारास धामणगाव आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयातील मृतदेह सोमनाथे लेआऊट परिसरातील घरी आणताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. अनेकांचे शब्दही मुके झाले होते आणि अश्रूही गोठले होते. काही वेळ स्मशान शांतता पसरली आणि अन्त्ययात्रेला सुरुवात होताच पुन्हा आक्रोश सुरू झाला. अखेर, अध्र्या तासाच्या अंतरात सहाही प्रेतयात्रा निघून स्मशानभुमीत पोहोचल्या. त्यावेळी स्मशानभूमीतही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनेची माहिती कळताच पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सकाळीच मृतकाच्या घरी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.
 
अपघाताची घटना मन हेलावणारी: पालकमंत्री
दुर्गा मातेची प्रतिमा घेऊन येणार्या भाविकांवर काळाने घातलेला घाला अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारा आहे. या भीषण अपघातात सात भाविकांचा मृत्यू होणे व जवळपास २१ जण जखमी होणे, ही घटना मनाला चटका लावणारी आहे. दुर्गा मातेच्या आगमनाच्या उत्साहात असलेल्या भाविकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या भाविकांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून या अपार दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच, अपघातात जखमी झालेल्या सर्व भाविकांना लवकरात लवकर बरे वाटावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.