अग्रलेख
editorial सरकार, मग ते राज्यातील असो की केंद्रातील, त्याच्याविरुद्ध विरोधकांनी आणि सामाजिक संस्थांनी आंदोलन करण्यात काहीही गैर नसते. सरकार चुकीच्या मार्गावर जात असेल, लोकहिताच्या विरोधात निर्णय घेत असेल तर सरकारला योग्य मार्गावर आणणे, हे विरोधी पक्षांचे कर्तव्य आहे. आपल्या घटनेने आंदोलनाचा अधिकार सर्वांनाच दिला आहे. मात्र, सध्या घटनेने दिलेल्या या अधिकाराचा अतिरेकी दुरुपयोग केला जात आहे, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. काँग्रेस सत्तेवर असताना भाजपाने तेव्हाच्या सरकारविरुद्ध अनेकवेळा आंदोलने केली. पण भाजपाची त्यावेळची आंदोलने व्यापक समाजहित आणि देशहितासाठी होती. भाजपाने आंदोलनाच्या या शस्त्राचा कधीच दुरुपयोग केला नाही. बाह्य शक्तींच्या हाती आंदोलन जाऊ दिले नाही. आता विरोधक त्याबद्दल खरोखर सजग आहेत काय, की देशविरोधी शक्ती त्यांच्या आडून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, याचा धांडोळा घेण्याची वेळ आलेली आहे. आंदोलन कशासाठी करायचे, त्यातून खरोखरच समाजहित आणि देशहित साधले जाणार आहे का, याचे आत्मपरीक्षण आंदोलन करणाऱ्यांकडून अपेक्षित असते.
२०१४ नंतर देशात विविध मुद्यांवर झालेली आंदोलने आणि २०१४ च्या आधी झालेली आंदोलने यामध्ये मोठा गुणात्मक फरक आहे. २०१४ च्या आधी झालेली आंदोलने देशातील घटनात्मक संस्थांच्या विरोधात नव्हती, तर काही नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध होती. त्या मंत्र्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे धडधडीत पुरावे होते. त्यामुळे या नेत्यांना मंत्रिमंडळातून हटवावे, त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी ही आंदोलने झाली होती. संपुआ सरकारच्या काळातील काही लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे विरोधी पक्षांनी समोर ठेवल्यावरही तेव्हाच्या सरकारने राजीनामे न घेता अनेक भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण केली होती. त्यामुळे ‘इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा:‘ या न्यायाने तेव्हाच्या विरोधी पक्षांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारविरुद्ध आंदोलन छेडले होते.
नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या विरोधात राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर जुलै महिन्यात आंदोलन झाले होते. आभासी जगात अवतरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले होते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते केले जात होते. सुरुवातीला या आंदोलनाची तीव्रता सरकारला जाणवली नाही. पण, पुढे ती वाढली. संसद मार्च आंदोलनाच्या दिवशी पोलिस यंत्रणेला हुलकावणी देत आंदोलकांनी थेट संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक दिली. त्यामुळे सरकारला प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. जंतरमंतर संसद भवनापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे तेथील आंदोलनाचा आवाज सरकारच्या कानावर लवकर पोहोचतो, असे मानले जाते. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना गेल्या १२ वर्षांत जंगजंग पछाडूनही पंतप्रधान तर सोडा, पण सरकारमधील एकाही मंत्र्याच्या विरोधात काहीही सापडले नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने आता देशातील घटनात्मक संस्थांच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात सध्या सुरू असलेले आंदोलन हा विरोधी पक्षांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कुठल्या तरी व्यापक षडयंत्राचा भाग असण्याची शक्यता वाटते. मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) मुद्यावरून विरोधी पक्षांनी रान पेटवले आहे. २०२४ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक हे मॅचफिक्सिंग होते, असा आरोप काँग्रेसने केला आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक पूर्णपणे बोगस होती, असा आरोप काँग्रेस करत आहे. गंमत म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. २४० जागांवरच भाजपाची गाडी थांबली. काँग्रेसच्या आरोपाप्रमाणे भाजपाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून गैरप्रकार केले असते तर भाजपाला साडेतीनशेच्या वर जागा मिळाल्या असत्या. तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने निवडणूक आयोगाला हाताशी धरत गैरप्रकार केले, या आरोपावर छोटे मूलही विश्वास ठेवणार नाही.
शिवाय, निवडणूक आयोगाच्या मदतीने सर्व निवडणुकांत भाजपा गैरप्रकार करते, असे विरोधकांना म्हणायचे असेल तर सर्व राज्यांत भाजपाचीच सत्ता हवी होती. पंजाबमध्ये आपची, तामिळनाडूत जोसेफ विजय यांच्या टीव्हीकेची तर केरळ, तेलंगणा आणि कर्नाटकात काँग्रेसची सत्ता कशी आली, याचे उत्तर काँग्रेस नेत्यांनी विशेषत: राहुल गांधींनी दिले पाहिजे. पण ज्या पक्षाचे नेतृत्व राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेत्याकडे आहे, त्याच्याकडून संयमी, प्रगल्भ आणि जबाबदारीच्या वागणुकीची अपेक्षा करता येत नाही. जंतरमंतरवर ‘आयसा’ या डाव्या विचारांच्या संघटनेने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधत २ ऑक्टोबरला आंदोलनाचा प्रयत्न केला. प्रयत्न यासाठी म्हटले, की पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. या आंदोलनात आप आणि काँग्रेसही सहभागी झाली. जंतरमंतरवर पहिले आंदोलन करणाऱ्या अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने दिल्ली पोलिसांच्या भीतीने यावेळी मुंबईला पळ काढला आणि तेथे शिवाजी पार्कवर आंदोलनाची हाळी दिली. जंतरमंतरवरील पहिल्या आंदोलनात पोलिसांकडून काही चुका झाल्या हे खरेच. दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होतेच. त्या आंदोलनापासून धडा घेत यावेळी दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर ‘परिंदा भी पर नहीं मार सकेगा’, अशी सुरक्षा व्यवस्था ठेवली. त्यामुळे यावेळच्या आंदोलनाला अपेक्षित असे यश आणि प्रतिसाद मिळाला नाही. यापुढे विरोधकांचे नैराश्य वाढत जाणार आहे. घटनात्मक संस्थांना लक्ष्य करण्यातून तेच दिसते. कधी सरन्यायाधीश सूर्य कांत विरोधकांच्या रडारवर असतात, तर कधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार. घटनात्मक पदावर असल्यामुळे या लोकांना राजकीय नेत्यांप्रमाणे आपली बाजू मांडता येत नाही. त्यामुळे विरोधकांचे फावते. पण यावेळच्या आंदोलनातून विरोधकांच्या पदरी निराशाच पडणार आहे. कारण देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत देशात चुकीचे आणि बेकायदेशीर असे काही होणार नाहीत, हा देशातील जनतेचा विश्वास ही लोकशाही टिकवण्यात सार्थक ठरणार आहे. विरोधी पक्षांनी कितीही आंदोलने केली तरी त्यातून काही साध्य होणार नाही. जोपर्यंत कोणत्याही आंदोलनात सर्वसामान्य जनता उतरत नाही, तोपर्यंत कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. १९७७ मध्ये आणिबाणी विरोधातील आंदोलनाला देशातील जनतेचा पाठिंबा होता. २०१३ मध्ये संपुआ सरकारविरोधातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला जनतेचा पाठिंबा होता. त्यामुळे ती दोन्ही आंदोलने यशस्वी झाली होती. जनतेच्या पाठिंब्यामुळे तत्कालीन दोन्ही सरकारांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक आहे. तेव्हा देशातील जनतेला भ्रष्ट सरकार नको होते, आता देशातील जनतेला भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ असणारे मोदी सरकारच सत्तेत हवे आहे. घटनात्मक संस्थांच्या विरोधात आंदोलन करण्यातून देशाचे भले होणार नाही. विरोधकांना कोणताच फायदाही होणार नाही. अशा उठवळ आंदोलनांच्या स्वरूपातील कोणतेही षडयंत्र देशातील जनता खपवून घेणार नाही, हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे आणि अन्य विधायक मार्गाने विरोध करण्यास शिकले पाहिजे. आंदोलन जरूर करावे; पण, त्याचे रुपडे व हेतू विधायक आणि कल्याणकारीच असला पाहिजे.