मूल,
two-wheeler-crashes-into-iron-barricade मूल-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील आकापूर गावालगतच्या वळण मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये मोहित मधुकर चौधरी (32, रा. नवेगाव चक) आणि गणेश राजू येसनसुरे (31, रा. सिंदेवाही) यांचा समावेश आहे.
दोघेही दुचाकीने (एमएच 34 बीवाय 7678) मूलहून सावलीच्या दिशेने जात होते. आकापूर गावाजवळील वळणावर दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी महामार्गाच्या बाजूला असलेल्या लोखंडी बॅरिकेटला जोरदार धडकली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीस्वार बॅरिकेटवर आदळून खाली पडले आणि दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच ठाणेदार विजय राठोड व चमुने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले.
या मार्गावरील वळण धोकादायक असल्याने यापूर्वीही येथे अनेक अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मार्गावरील धोकादायक वळण लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने यापूर्वी दोन्ही बाजूंना लोखंडी बॅरिकेट लावले आहेत. त्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचेही सांगण्यात येते. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या या अपघातामुळे पुन्हा एकदा या वळणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.