आर्वीतील नपत शेकडो रिकाम्या दारूच्या बाटल्या

बंद घंटागाडीत पडला खच

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
आर्वी,
wardha-news वर्धा जिल्हा दारूबंदी असलेला जिल्हा असताना येथील नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारातच उभ्या असलेल्या घंटागाडीमध्ये शेकडो रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ज्या घंटागाडीत या बाटल्या आढळल्या ती गाडी अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत, बिन-चाकाची (बिना टायरची) अवस्थेत कार्यालयातच उभी आहे. बंद आणि चक्क बिन-चाकाची गाडी असूनही आत कचर्याने भरलेली ही गाडी नगरपरिषद कार्यालय परिसरात कशी उभी करण्यात आली. जर हा कचरा बाहेरून संकलित करून आणला असेल तर बंद गाडी कचरा संकलनाला कशी गेली आणि जर कचरा बाहेरचा नसेल तर या शेकडो बाटल्या नगरपरिषद कार्यालय परिसरात असलेल्या घंटागाडीमध्ये कशा पोहोचल्या असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
 
wardha-news
 
गाडीत इतर कचर्यासोबत मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. नगरपालिका विरोधी पक्षनेते प्रा. पंकज वाघमारे यांनी तात्काळ या प्रकरणाची मुख्याधिकारी व अध्यक्षांनी चौकशी करावी व नगरपालिका परिसर, सभापती कक्ष या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात यावे अशी मागणी केली घटनेमुळे आर्वी नगरपरिषदेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्वच्छ आर्वी, सुंदर आर्वी म्हणणार्या प्रशासनाच्या स्वच्छतेच्या दाव्याचीच लक्तरे या घटनेने वेशीवर टांगली आहेत. प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.