अहेरी,
Wildlife Traffickingआलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या सिरोंचा रोडवरील नाग मंदिराच्या परिसरात वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी करणार्या एका मोठ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला होता. या प्रकरणात जिवंत खवल्या मांजर, वाघाचे सुळे दात आणि हाडे जप्त करण्यात आली असून तब्बल 13 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. अहेरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्यांनी सर्व आरोपींना 13 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वनविभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरील नाग मंदिराजवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली. 26 सप्टेंबर रोजी रात्री 7 ते 11 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. रामगुंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत आरोपींकडून वन्यजीव व त्यांचे अवयव जप्त करण्यात आले.
वनविभागाने कारवाई दरम्यान 1 मोठी जिवंत खवल्या मांजर, 1 जिवंत खवल्या मांजरीचे पिल्लू, वाघाचे 1 नख, वाघाची 44 हाडे, वाघाचे 2 सुळे दात, 3 दुचाकी वाहने इत्यादी साहीत्य जप्त केले. वनविभागाने या प्रकरणात वेगवेगळ्या तारखांना कारवाई करत 13 आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये चंदन बापुजी भोयर (53), रा. कोनसरी, जि. गडचिरोली, संजय पुल्ला पोरतेट (40) रा. झिमेला, जि. गडचिरोली, वासुदेव बिरसु मडावी (23) रा. कोकाबंडा, जि. गडचिरोली, महेश मुसली सडमेक (32) रा. आलापल्ली, जि. गडचिरोली, गजानन गणपत सिडाम (32) रा. झिमेला, जि. गडचिरोली, कालीचरण जयराम मडावी (46) रा. गोमणी टोला, जि. गडचिरोली, राकेश बाबुराव पेगडपल्ली (30) रा. डुम्मे, ता. एटापल्ली, बापुजी पाटाळी पुंगाटी (42) रा. डुम्मे, ता. एटापल्ली, सुधाकर डोलु पुंगाटी (20) रा. कोकाबंडा, ता. मुलचेरा, दिलीप माधव आत्राम (41) रा. झिमेला, ता. अहेरी, रामा दल्लु गावडे (30) रा. वासामुंडी, ता. एटापल्ली, सुभाष गणपत सिडाम (31) रा. झिमेला, ता. अहेरी व सुधाकर चंद्रशाही कोरेत (48) रा. आलापल्ली, ता. अहेरी यांचा समावेश आहे.
या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 2, 9, 39, 44, 48(ए), 49, 50, 51, 52 आणि भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 26(1) आय, 52 अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. रामगुंडेवार यांनी सर्व 13 आरोपींना अहेरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एच. पांचाळ यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व बाबी लक्षात घेऊन आरोपींना 13 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वनविभाग या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.