water crisis राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत २० टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण तीन हजार ३३ धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ७०.५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात हाच साठा ९०.७४ टक्के होता, याचाच अर्थ यंदा पाणीसाठ्यात तब्बल २०.२१ टक्क्यांची चिंताजनक घट नोंदवल्याची माहिती जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले. मराठवाडा आणि विदर्भातील पाण्याची पातळी चिंताजनक असल्याचे यात म्हटले आहे.

राज्यातील १३८ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या ७८.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, जो गतवर्षी याच दिवशी ९७.६२ टक्के होता. २६४ मध्यम प्रकल्पांमध्ये ६१.७१ टक्के पाणीसाठा (गतवर्षी ८३.५८ टक्के) शिल्लक आहे. राज्यामध्ये संख्येने सर्वाधिक असलेल्या दोन हजार ६३१ लघु प्रकल्पांची स्थिती अधिकच बिकट असून तिथे केवळ ४०.८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे.
२२ हजार ५०० गावांना फटका
सरासरीपेक्षा कमी पाऊस, खालावलेली भूजल पातळी आणि धरणांतील अपुऱ्या जलसाठ्यामुळे राज्यातील २२ हजार ५०० गावांना तीव्र पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. जून २०२७ पर्यंत हे संकट कायम राहून विक्रमी संख्येने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो. मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात देखील अशीच परिस्थिती आहे. उपलब्ध जलसाठ्याचे अत्यंत काटेकोर आणि न्याय्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.