सुदानमधील गृहयुद्धात १५३ जणांचा बळी

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
खार्तूम,
153 people killed in Sudan civil war सुदान आणि दक्षिण सुदान यांच्यातील वादग्रस्त अब्येई प्रदेशात झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात किमान १५३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अब्येई येथील एमीत बाजारात पेट्रोल पंपाजवळ ड्रोनने हल्ला केल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. हल्ल्यानंतर झालेला स्फोट अत्यंत शक्तिशाली होता. त्यामुळे बाजारपेठेत आग पसरली आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेनंतर बाजारात एकच गोंधळ उडाला. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने या हल्ल्यासाठी सुदानी सैन्याला जबाबदार धरले आहे. अब्येईचे कार्यवाहक माहिती मंत्री योहाना अकोल न्गोर यांनी मंगळवारी हा आरोप केला; मात्र, त्यासाठी कोणताही पुरावा सादर केला नाही.
 
 
  
153 people killed in Sudan civil war
 
 
दक्षिण सुदानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या हल्ल्यासाठी सुदानी सैन्याला जबाबदार ठरवले आहे. बाजारातील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याने नागरिकांचा मृत्यू झाला असून, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, सुदानी सैन्य आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) यांच्यात एप्रिल २०२३ पासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचे रूपांतर गृहयुद्धात झाले असून, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. गेल्या वर्षी निमलष्करी दलांनी सुदानमधील अल-फाशेर येथे केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका मशिदीचे मोठे नुकसान झाले होते. 
 
 
 
या हल्ल्यात ४३ जणांचा मृत्यू झाला होता. अलीकडील काही महिन्यांत ड्रोन हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या जीविताला असलेला धोका अधिक तीव्र झाला आहे. दुसरीकडे, आफ्रिकेतील माली देशातही हिंसाचाराची गंभीर घटना समोर आली आहे. पूर्व मालीतील मेनाका प्रदेशात आठवड्याच्या अखेरीस इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित अतिरेकी गटाने केलेल्या हल्ल्यात ४८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका खासदाराने मंगळवारी दिली. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. सुदानमधील गृहयुद्ध आणि मालीतील अतिरेकी हल्ल्यांमुळे आफ्रिकेतील विविध भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सततच्या सशस्त्र संघर्षांमुळे सामान्य नागरिकांना जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.