27 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मृत्यू!

तब्बल 13 लाख फॉलोअर्स, वडिलांचे गंभीर आरोप

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
चेन्नई,
social-media-influencer-dies एकीकडे एका अभिनेत्रीच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसलेला असताना आता दुसरीकडे एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मृत्यूची बातमी आहे. 27 वर्षांचा हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, ज्याचा मृत्यू झाला आहे. त्याचं नाव व्ही. हरीश असं आहे. हरीशचे सोशल मीडियावर 13 लाख फॉलोअर्स आहेत.
 
 
social-media-influencer-dies
 
हरीश गेल्या पाच वर्षांपासून फायनान्स आणि गुंतवणुकीशी संबंधित कंटेट पोस्ट करत होता. चेन्नईच्या मट्टुकाडु भागातील एका भाड्याच्या विलामध्ये त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्यात त्याचं ऑनलाइन चॅनेल मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट केल्यामुळे ब्लॉक करण्यात आलं होतं. त्याचं दुसरं सोशल मीडिया अकाउंटही ब्लॉक झालं होतं. त्यानंतर हरीशने नवीन चॅनेल सुरू केलं, पण तेसुद्धा रिपोर्ट करून ब्लॉक करण्यात आले.
 
 
हरीशचे वडील जे. विनायगम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, जेसन सॅम्युअल नावाच्या दुसèया इन्फ्लुएंसरने त्यांच्या मुलाला सतत सायबर बुलिंगचा शिकार बनवलं, त्याच्याविरुद्ध मानहानीकारक पोस्ट केल्या आणि धमक्या दिल्या. या सर्व प्रकारामुळे हरीशला तीव्र मानसिक त्रासाचा सामना करावा लागला होता. वडील विनायगम यांच्या सांगण्यानुसार, सॅम्युअलने 18 ऑक्टोबर रोजी काही व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केल्या होत्या, ज्यामध्ये हरीशवर फसवणूक केल्याचा आणि लोकांना दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
आत्महत्येपूर्वी हरीशने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. असं सांगितलं जात आहे की, या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या मृत्यूच्या निर्णयासाठी सॅम्युअलला जबाबदार धरलं आहे. हरीशने असं म्हटलं होतं की, सॅम्युअलने त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करण्याची आणि नवीन अकाउंट्स तयार करण्यापासून रोखण्याची धमकी दिली होती.