शेअर बाजारात घसरणीचे वादळाने ८.७८ लाख कोटींचा चुराडा!

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई,
A storm of decline in the stock market शेअर बाजारात सुरुवातीच्या तेजीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण केला; मात्र काही तासांतच बाजाराने अचानक दिशा बदलल्याने मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्स १,४००.४१ अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये ४४८.६५ अंकांची घसरण नोंदवण्यात आली. या उलटफेरामुळे अवघ्या २४५ मिनिटांत मुंबई शेअर बाजाराचे बाजारमूल्य ८.७८ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. मंगळवारी दसऱ्यामुळे बाजार बंद होता. त्यामुळे बुधवारी बाजारात तेजी राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. रिलायन्स जिओचा आयपीओ बाजारात दाखल होत असल्यानेही गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराच्या हालचालींकडे लागले होते. सुरुवातीच्या ४० मिनिटांत सेन्सेक्स ८२९ अंकांनी वाढून ७४,६८२.१९ या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला, तर निफ्टी २३२ अंकांनी वधारून २३,१२०.९० अंकांवर गेला. मात्र, त्यानंतर नफावसुली सुरू झाल्याने बाजारातील तेजी ओसरली.
 
 
a24364576
 
दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलले होते. सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून १,४००.४१ अंकांनी घसरून ७३,२८१.७८ अंकांवर आला. त्याचवेळी निफ्टी ४४८.६५ अंकांनी खाली येत २२,६७२.२५ अंकांवर व्यवहार करत होता. या घसरणीमागे गुंतवणूकदारांकडून झालेली नफावसुली, कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ आणि इंडिया व्हीआयएक्समधील चढ-उतार यांचा प्रभाव असल्याचे बाजारातील जाणकारांनी नमूद केले. प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्येही विक्रीचा दबाव दिसून आला. राष्ट्रीय शेअर बाजारात बजाज फायनान्स, आयशर मोटर्स आणि इटरनल यांच्या समभागांमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. श्रीराम फायनान्स आणि नेस्ले इंडियाचे समभाग जवळपास ३ टक्क्यांनी घसरले. मुंबई शेअर बाजारातही बजाज फायनान्स आणि इटरनलच्या समभागांमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घट झाली, तर मारुती, ट्रेंट आणि इंडिगोच्या समभागांमध्ये २.५० टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली.
 
 
या घसरणीचा सर्वाधिक परिणाम बाजाराच्या एकूण मूल्यावर झाला. सेन्सेक्स ७४,६८२.१९ अंकांच्या उच्चांकावर असताना बीएसईचे एकूण बाजारमूल्य ४,६८,३०,०४०.०७ कोटी रुपये होते. मात्र, सेन्सेक्स ७३,२८१.७८ अंकांवर घसरल्यानंतर बाजारमूल्य कमी होऊन ४,५९,५१,९०२.२४ कोटी रुपयांवर आले. म्हणजेच, अवघ्या २४५ मिनिटांत बाजारमूल्यात ८,७८,१३७.८३ कोटी रुपयांची घट झाली. बाजारातील या अचानक झालेल्या उलटफेरामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला असून, कच्च्या तेलाच्या किमती आणि बाजारातील अस्थिरतेकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.