‘अबीर’च्या नव्या पोस्टरमधून सौंदर्याच्या पारंपरिक संकल्पनांना प्रश्न

आंतरराष्ट्रीय महोत्सवांतही चित्रपटाची छाप

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई
abir marathi movie सौंदर्याच्या रूढ कल्पनांना आव्हान देत स्त्रीचा आत्मसन्मान, तिचे मनोधैर्य आणि अस्तित्वासाठीचा संघर्ष मांडणारा ‘अबीर’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवड झाल्याने या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीचा लौकिक सातासमुद्रापार पोहोचवला आहे. त्यातच विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या नव्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन, सौंदर्याच्या कल्पनांमागील पूर्वग्रह आणि तिच्या अंतर्मनातील भावविश्व यांचा वेध घेणारे हे पोस्टर चित्रपटाच्या आशयाची झलक दाखवते.
 

abir marathi movie new poster out | women empowerment and social message  
श्री. सुदेश वसंतराव झावरे पाटील यांनी ‘अबीर’ची निर्मिती केली असून, शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांनी चित्रपट सादर केला आहे. आकाश विष्णू शिंदे यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन करण्याबरोबरच दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. स्त्रीच्या सौंदर्याला अवास्तव महत्त्व देताना तिच्या कलागुणांकडे आणि क्षमतांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सामाजिक मानसिकतेवर चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. स्त्रीने आत्मविश्वासाने स्वतःचे स्थान निर्माण करावे, तसेच तिच्यावरील भेदभाव आणि अत्याचारांना आळा बसावा, हा या चित्रपटामागील प्रमुख विचार आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये गडद केशरी आणि तपकिरी रंगछटांची पार्श्वभूमी, स्त्रीची छायाकृती आणि प्रकाश-सावल्यांची परिणामकारक रचना लक्ष वेधून घेते. त्यात मध्यभागी असलेला ‘सौंदर्य चेहऱ्यात शोधायचं की संस्कारात?’ हा प्रश्न समाजाच्या सौंदर्यविषयक दृष्टिकोनाला थेट आव्हान देतो. बाह्य रूपापेक्षा व्यक्तिमत्त्व, संस्कार आणि अंतःसौंदर्य यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही मांडणी चित्रपटाच्या मध्यवर्ती आशयाची जाणीव करून देते. दिग्दर्शक आकाश शिंदे यांनी स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव समाजाला करून देण्यासह तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न या कलाकृतीतून केला आहे.
‘अबीर’ची जर्मनीतील २२व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल स्टुटगार्टमध्ये निवड झाली आहे. त्यानंतर दिल्लीतील जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतील या निवडींमुळे चित्रपटातील सामाजिक आशयाला व्यापक व्यासपीठ मिळाले असून, मराठी चित्रपटाच्या आशयसमृद्धतेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात असल्याचे अधोरेखित झाले आहे.
नव्या पोस्टरविषयी बोलताना दिग्दर्शक आकाश विष्णू शिंदे म्हणाले, “बाह्यसौंदर्याच्या झगमगाटात अनेकदा स्त्रीचे अंतःसौंदर्य, तिची स्वप्ने आणि तिच्या भावविश्वातील असंख्य रंग दुर्लक्षित राहतात. याच उपेक्षित भावनांना संवेदनशीलतेचा स्पर्श देत स्त्रीच्या अस्तित्वाचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘अबीर’मधून केला आहे. पोस्टरमधील सूचक मांडणी, भावनांची गूढ किनार आणि त्यातून उमटणारा आशय कथानकातील अनेक पदरांविषयी उत्सुकता जागवतो. विजयादशमी हा वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाच्या विजयाचा सण आहे. त्याच धर्तीवर सौंदर्याच्या संकुचित कल्पनांवर माणुसकीच्या उदात्त विचारांचा विजय व्हावा, हीच ‘अबीर’मागील भावना आहे.”
निर्माते श्री. सुदेश abir marathi movie वसंतराव झावरे पाटील यांनीही चित्रपटाच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “सौंदर्याला वर्णाच्या चौकटीत बंदिस्त करणाऱ्या मानसिकतेवर प्रहार करताना स्त्रीच्या कर्तृत्वाला, तिच्या जिद्दीला आणि स्वाभिमानाला नवा आयाम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘अबीर’च्या पोस्टरमधील प्रत्येक भावछटा ही केवळ कथानकाची चाहूल नसून, समाजाच्या डोळ्यांवरील पूर्वग्रहांची झापडे दूर करण्याचे एक संवेदनशील आवाहन आहे. महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेत अबीर, वारकरी संप्रदाय आणि सावळ्या विठुरायाचे नाते हे केवळ श्रद्धेचे नसून, भक्तीच्या अखंड रंगात न्हाऊन निघालेल्या आत्मीयतेचे आहे. ‘अबीर’ हा केवळ मनोरंजनाचा चित्रपट नसून, मातीशी नाळ जपणाऱ्या ग्रामीण रसिकांपासून ते विठुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात भक्तीचा अबीर उधळणारा एक भावस्पर्शी चित्रानुभव ठरणार आहे.”
 
 
 
या चित्रपटात पायल जाधव, निखिल चव्हाण, देविका दफ्तरदार, अविनाश नारकर, गणेश देशमुख, प्राजक्ता हनमघर, गार्गी फुले, यश डिंबळे, रोशन सुनील राऊत, प्रशांत नेटके, गायत्री सुदेश झावरे, रेखा दहातोंडे, राजवर्धन झावरे आणि साईराज केंद्रे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. सुजित झावरे पाटील यांनीही या चित्रपटात विशेष भूमिका साकारली आहे.
चित्रपटाच्या निर्मिती व्यवस्थापनात विष्णू घोरपडे यांनी प्रोडक्शनची जबाबदारी सांभाळली आहे. मंगेश भीमराज जोंधळे हे कार्यकारी निर्माते असून, प्रसिद्धी आणि वितरणाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. निशांत भागवत यांनी छायांकन केले आहे, तर अमित खंडागळे यांनी सहदिग्दर्शन केले आहे. निलेश गावंड यांनी चित्रपटाचे संकलन केले असून, रोहित नागभिडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीताची धुरा सांभाळली आहे. चित्रपटातील गीतांना आर्या आंबेकर, वैशाली माडे आणि राधा खुडे यांनी पार्श्वस्वर दिला आहे.
सुजित सुरवसे यांनी रंगभूषा, तर स्नेहल नार्वेकर यांनी वेशभूषेची जबाबदारी पार पाडली आहे. महेश गोरे यांनी कला दिग्दर्शन केले असून, विकास खंदारे यांनी ध्वनी संयोजन आणि स्वरूप जोशी यांनी ध्वनी संकलन केले आहे. सामाजिक आशय, स्त्रीच्या आत्मसन्मानाचा विचार आणि भक्तिपरंपरेशी जोडलेली भावनिक अभिव्यक्ती यांचा संगम साधणारा ‘अबीर’ आपल्या कथानकातून कोणता प्रभाव पाडतो, याकडे आता चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.