आलापल्ली-खांदला रस्त्यासाठी आदिवासींचा एल्गार

हजारो ग्रामस्थांची पदयात्रा, अहेरीत प्रशासनासमोर ठिय्या

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
अहेरी, 
aheri-tribal-villages-road-protestवर्षानुवर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या अहेरी तालुक्यातील पाच गावांतील आदिवासी ग्रामस्थांचा संताप अखेर आंदोलनाच्या रूपाने रस्त्यावर आला आहे. आलापल्ली ते खांदला या सुमारे 22 किलोमीटरच्या रस्त्याच्या मागणीसाठी हजारो ग्रामस्थांनी अहेरीच्या दिशेने पायी मोर्चा काढून अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
 
 
aher
 
खांदला ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या मरनेली, चिरेपल्ली, कोत्तागुडम, पत्तीगाव आणि खांदला या दुर्गम गावांतील नागरिकांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. यात महिला, पुरुष, वृद्ध तसेच शालेय विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दळणवळणाची हक्काची सुविधा मिळवण्यासाठी ग्रामस्थांना विनासायास पायपीट करावी लागल्याने, दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
 
आलापल्ली ते खांदला रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र आश्‍वासनांशिवाय काहीही हाती लागले नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दैनंदिन प्रवासातील अनंत अडचणी संपत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
शाळेत जाणारे विद्यार्थी, उपचारासाठी बाहेर पडणारे रुग्ण आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी बाजारपेठेत ये-जा करणार्‍या नागरिकांना या मार्गावरून चालताना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे या भागाचा संपर्क तुटतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि रुग्णांचे आरोग्य धोक्यात येते.
 
 
आंदोलकांनी सुमारे 20 किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करून आलापल्ली गाठले आणि तिथून अहेरीकडे कूच केली. या दीर्घ पदयात्रेच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देऊन ठोस निर्णयाची मागणी केली जाणार आहे. पाच गावांतील ग्रामस्थ एकत्र आल्याने या आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.