रायगड
8 Students Drown रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आळंदी येथील खासगी क्लासेसशी संबंधित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आणि निष्काळजीपणा केल्याचा आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे गेले होते. या सहलीदरम्यान समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली होती. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप समोर आल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी विनर्स अकॅडमीचे संस्थापक अमर नाडक, मृणाल नरसखेडे, सभा महबूब इनामदार, शिल्पा अमन नाडक आणि वैशाली मृणाल नरसखेडे या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली गेली नाही, असा आरोप मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.
मृत विद्यार्थी राजवीर वाहिले यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या दुर्घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू असून, तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.