शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटी!

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
हैदराबाद,
Families of martyred police personnel to receive 2 crore कर्तव्य बजावताना प्राण गमावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना तेलंगणा सरकारकडून आता २ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. हैदराबाद येथील गोशामहल पोलीस स्टेडियममधील पोलीस शहीद स्मारकावर आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलीस परेडची सलामी स्वीकारून शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, कर्तव्यावर असलेल्या होमगार्डच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी सानुग्रह मदत ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
 
 
s234334546
 
पोलीस विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी तेलंगणा सरकारने भरती प्रक्रियेलाही प्राधान्य दिले आहे. विभागातील सर्व रिक्त पदांवर २०२८ पर्यंत भरती पूर्ण करण्यात येईल, असे रेवंत रेड्डी यांनी जाहीर केले. राज्याच्या इतिहासात उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात डीएसपी पदांच्या ११० जागांवर भरती करणे हे अभूतपूर्व पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलीस अधिकाऱ्यांनी महिला आणि बालकांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये अधिक संवेदनशीलतेने काम करावे, तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्यात विलंब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. गुन्ह्यांची हाताळणी करताना पीडितांच्या समस्या गांभीर्याने समजून घेण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
 
 
दरम्यान, राज्यातील तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तरुणांचे व्यसनांपासून संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासोबतच नागरिकांच्या जीविताचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार रेवंत रेड्डी यांनी केला. शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी वाढीव आर्थिक मदत, होमगार्डसाठी सानुग्रह अनुदानात वाढ आणि पोलीस विभागातील रिक्त पदांची भरती या घोषणांमुळे राज्याच्या पोलीस यंत्रणेला बळकटी देण्याच्या सरकारच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.