मुंबई
Heatwave राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा वाढला असून, उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांचा धोका वाढत असतानाच, पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अतिउष्णतेला ‘वैद्यकीय आणीबाणी’ संबोधत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात विभागाने वैद्यकीय मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आरोग्य विभागाने नागरिकांना तहान लागण्याची वाट न पाहता नियमितपणे पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. तहान लागणे हे शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होत असल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शरीरातील पाणी आणि क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस, लिंबूपाणी, ताक आणि लस्सी यांसारख्या पेयांचे सेवन करावे. आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात मीठ घातलेला फळांचा रसही घेता येईल. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर तसेच पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या हंगामी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हात बाहेर पडताना कपड्यांची निवड महत्त्वाची
उष्णतेचा शरीरावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी कपड्यांची निवडही महत्त्वाची आहे. नागरिकांनी शक्यतो पातळ, सैल आणि सुती कपडे वापरावेत. फिकट रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे. घराबाहेर पडताना डोके झाकून ठेवावे. थेट सूर्यप्रकाशात जाण्याची वेळ आल्यास छत्री किंवा टॉवेलचा वापर करून डोक्याचे संरक्षण करावे. तसेच उन्हात बाहेर जाताना पायांचे संरक्षण करण्यासाठी बूट किंवा चप्पल घालावी.
लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठांना अधिक धोका
उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक त्रास होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुले आणि बालके, घराबाहेर काम करणारे कामगार, शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेले नागरिक, विशेषतः हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण, गर्भवती महिला तसेच मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना उष्णतेचा अधिक धोका असतो. त्यामुळे या व्यक्तींनी शक्यतो तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे आणि शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखावी.
घर थंड ठेवण्यासाठी उपाययोजना करा
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरातील वातावरण थंड ठेवणेही आवश्यक आहे. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची आणि आजारी व्यक्तींची नियमित विचारपूस करावी. घरात थेट सूर्यप्रकाश येऊ नये यासाठी पडदे, शटर किंवा सनशेडचा वापर करावा. रात्रीच्या वेळी बाहेरील वातावरण थंड झाल्यानंतर खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शक्य असल्यास दिवसा घराच्या खालच्या मजल्यावर राहावे.
शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पंखे, पाण्याची फवारणी करणाऱ्या बाटल्या, ओले कापड आणि बर्फाचा वापर करता येतो. सुमारे २० अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात घोट्यापर्यंत पाय बुडवून ठेवल्याने शरीराला थंडावा मिळण्यास आणि उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यास मदत होऊ शकते.
उष्माघाताची लक्षणे ओळखा; गंभीर स्थितीत तातडीने वैद्यकीय मदत घ्या
उष्माघात ही जीवघेणी स्थिती ठरू शकते. त्यामुळे त्याची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे. शरीराचे तापमान सुमारे ४० अंश सेल्सिअस (१०४ अंश फॅरेनहाइट) किंवा त्यापेक्षा अधिक होणे, त्वचा गरम, लाल आणि कोरडी पडणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, अस्वस्थता, बेशुद्ध पडणे, स्नायूंमध्ये अशक्तपणा, मळमळ आणि उलट्या होणे ही धोक्याची लक्षणे आहेत. हृदयाचे ठोके वेगाने पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, भूक मंदावणे आणि असामान्य चिडचिडेपणाही जाणवू शकतो.
याशिवाय लघवीचे प्रमाण कमी होणे, तोंड कोरडे पडणे, त्वचा शुष्क होणे, डोळे खोल जाणे, सुस्ती येणे, शरीर आखडणे आणि शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्राव होणे ही लक्षणेही दुर्लक्षित करू नयेत. गंभीर उष्माघातामध्ये झटके येणे किंवा व्यक्ती कोमात जाणे अशी परिस्थिती उद्भवू शकते.
अशी गंभीर लक्षणे दिसल्यास रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देणे आवश्यक आहे. विशेषतः बेशुद्धावस्था, झटके किंवा शरीराचे तापमान अत्यंत वाढणे अशी लक्षणे आढळल्यास विलंब न करता आपत्कालीन वैद्यकीय सेवा घ्यावी. उष्णतेच्या लाटेचा कालावधी लक्षात घेता नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःसह कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.