लोकमान्य नगरमध्ये तीव्र पाणीटंचाई

महिलांचे पाणीपुरवठा विभागाला निवेदन

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
कारंजा लाड, 
karanja-lokmanya-nagar-water-shortageशहरातील लोकमान्य नगर परिसरामध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ऐन पाणी सोडण्याच्या दिवशी नळाला पाण्याचा एक थेंबही न आल्यामुळे संतप्त नागरिकांनी व महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा विभागाला निवेदन सादर केले आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.
 
 
ladd
 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत कारंजा शहरासाठी आठवड्यातून दोन दिवस (सोमवार आणि शुक्रवार) प्रत्येकी दोन तास पाणीपुरवठा करण्याचे अधिकृत वेळापत्रक ठरवून देण्यात आले आहे. मात्र, या वेळापत्रकाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. आज पाणी सोडण्याचे निर्धारित दिन असतानाही लोकमान्य नगर परिसरातील बहुतांश नळांना पाणी आलेच नाही.
 
 
त्यामुळे परिसरातील नागरिकांना व विशेषतः महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली असून, प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. सध्याची भीषण पाणीटंचाई आणि नागरिकांची वाढती गरज लक्षात घेता, प्रशासनाने केवळ नावापुरता पाणीपुरवठा न करता ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. आठवड्यातून केवळ २ दिवस आणि अवघे २ तास पाणी पुरवठा करण्याऐवजी तो किमान ५ तास पूर्ण दाबाने सोडण्यात यावा, जेणेकरून परिसरातील प्रत्येक कुटुंबाला आणि नागरिकाला आपली पाण्याची गरज भागवता येईल.
 
 
स्थानिक नागरिकांच्या व महिलांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पाणीपुरवठा सुरळीत व वाढीव वेळेत करावा, अन्यथा महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समस्त लोकमान्य नगरवासियांतर्फे देण्यात आला आहे.