रात्रभरातच बदलतो कुडवा जैवविविधता उद्यानाचे चित्र!

१४ कामांच्या बिलांवर तक्रारीनंतर प्रशासनाची धावपळ

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
गोंदिया, 
kudwa-biodiversity-park-work-inquiryशहरालगतच्या कुडवा येथील जैवविविधता वन उद्यानातील रखडलेल्या कामांना अचानक वेग आला असून अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असलेली कामे आता युद्धपातळीवर पूर्ण करण्याची धावपळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, कामे पूर्ण होण्यापूर्वीच १४ कामांची बिले काढण्यात आल्याची तक्रार वरिष्ठ स्तरावर झाल्यानंतर आणि उद्यानाची पाहणी सुरू झाल्यानंतरच या कामांना गती आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आठ दिवसांत उद्यानाचे चित्र बदलण्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
kudva
 
जिल्हा वार्षिक योजना आणि राज्य योजनांच्या माध्यमातून कुडवा येथील या महत्त्वाकांक्षी उद्यानासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, निधी खर्च होत असतानाही उद्यानातील कामांची स्थिती अपेक्षेप्रमाणे सुधारली नसल्याचे चित्र होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यानातील १४ विविध कामांचे कंत्राट देण्यात आले होते. यापैकी काही कामे अपूर्ण असताना, तर काही ठिकाणी कामांना सुरुवातही झाली नसताना संबंधित कंत्राटदारांना ऑक्टोबरपूर्वीच लाखो रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचा आरोप स्थानिक कंत्राटदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. विशेष म्हणजे, कार्यारंभ आदेश मिळूनही काही कामे सुरू झाली नव्हती, तर काही कामे अपूर्ण असल्याचे सांगितले जाते. आता मात्र मजुरांची संख्या वाढवून आणि वेगाने कामे पूर्ण करण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.
 
 
मात्र, कामांना उशिरा सुरुवात का झाली आणि कामे पूर्ण होण्यापूर्वीच बिले अदा करण्यात आली होती, याची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी होणे आवश्यक आहे. चौकशीतूनच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल. तर ही माहिती केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रार दाखल झाल्याने उद्यानातील कामांची प्रत्यक्ष स्थिती, बिलांची देयके आणि निधी वितरणाची प्रक्रिया यांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. त्यात आता वरिष्ठ स्तरावरील चौकशीत १४ कामांच्या बिलांबाबत काय निष्पन्न होते, कामांची प्रत्यक्ष स्थिती आणि कागदोपत्री नोंदी यांत तफावत आढळते का आणि उद्यानातील कामांचा दर्जा तपासला जातो का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
 
तक्रारीनंतर प्रशासनाची धावपळ!...
उद्यानातील कथित आर्थिक अनियमितता आणि अपूर्ण कामांची बिले अदा केल्याच्या आरोपांबाबत जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकत्र्यांनी वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रारी केल्याचे समजते. या तक्रारींची दखल घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांनी उद्यानातील कामांची पाहणी करण्याचे निर्देश दिले. यानंतर वरिष्ठ अधिकर्‍यांनी उद्यानाला प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यानंतर रखडलेल्या कामांना अचानक वेग आल्याचे चित्र दिसू लागले.
 
कामाचा दर्जा सुधारतोय की केवळ मलमपट्टी?
८ ऑक्टोबर आणि १६ ऑक्टोबर रोजीच्या छायाचित्रांतून उद्यानातील कामांच्या स्थितीतील बदल अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आठ दिवसांच्या अंतराने दिसणारा हा बदल चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, कामे वेगाने पूर्ण करणे आणि ती दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे, या दोन वेगळ्या बाबी आहेत. कामांच्या पूर्ततेसाठी घाई केली जात असेल, तर त्याचा दर्जावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उद्यानातील कामांची गुणवत्ता, वापरलेले साहित्य आणि प्रत्यक्ष खर्च यांचे तांत्रिक परीक्षण करण्याची मागणी पुढे येत आहे.
...