बिबट्याने केला दुचाकीस्वारांचा पाठलाग

प्रसंगावधानाने वाचले तिघांचे प्राण वाचले

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
चिमूर,
leopard-chases-bike-riders-adegaonकाजळसर-बोथली मार्गावरील अडेगाव फाट्यावर बिबट्याने दुचाकीस्वारांचा पाठलाग केल्याची थरारक घटना घडली. दुचाकी अचानक समोर आल्याने बिबट्या आक्रमक झाला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून दुचाकी भरधाव पुढे नेल्याने दुचाकीवरील तिघे थोडक्यात बचावले. ही घटना बुधवारी, 21 ऑक्टोबरला सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.
 

leo
 
तालुक्यातील सिरसपूर येथील तीन व्यक्ती दुचाकीने काजळसर-बोथली मार्गे सिरसपूरकडे जात होते. दरम्यान, अडेगाव फाट्याजवळ बोथली तलाव परिसरात पाणी पिण्यासाठी जाणारा बिबट्या रस्ता ओलांडत असताना दुचाकी अचानक त्याच्या समोर आली. समोर बिबट्या दिसताच दुचाकीवरील तिघांचीही घाबरगुंडी उडाली. याचवेळी बिबट्याने दुचाकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने क्षणाचाही विलंब न करता दुचाकी वेगाने पळवली. बिबट्याने काही अंतरापर्यंत दुचाकीचा पाठलाग केला. मागे बसलेल्या व्यक्तीच्या पायाजवळ बिबट्या पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, चालकाने वेगाने दुचाकी पुढे नेल्याने तिघेही सुखरूप बचावले. काही अंतर पाठलाग केल्यानंतर बिबट्या तलाव परिसरातील जंगलात निघून गेला.
 
या थरारक घटनेतून बचावल्यानंतर तिघांनी बोथली गावात आपबिती सांगितली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत बिबट्या जंगलात पसार झाला होता. या घटनेमुळे काजळसर-बोथली मार्गावरून ये-जा करणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.