मुंबई
maharashtra st employees राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवरून महाराष्ट्र राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. कर्मचाऱ्यांची थकीत देणी आणि वेतनवाढीतील फरकाची रक्कम तातडीने देण्याची मागणी करत एसटी कर्मचारी तथा काँग्रेसने सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या ३ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक निधी उपलब्ध करून न दिल्यास दिवाळीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवून निषेध नोंदवण्यात येईल, असे संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी स्पष्ट केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास ४ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. मात्र, या इशाऱ्यानंतरही सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे आता ३ नोव्हेंबरपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा दिवाळीत मुख्यमंत्र्यांना खारा फराळ पाठवून सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला जाईल, असे बरगे यांनी म्हटले आहे.
एसटी कर्मचारी काँग्रेसच्या दाव्यानुसार, कर्मचाऱ्यांची ५ हजार ७४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम विविध स्वरूपात थकीत आहे. यामध्ये भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि उपदान अर्थात ग्रॅच्युइटीपोटी जमा न झालेल्या सुमारे ३ हजार ३५० कोटी रुपयांचाही समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित या रकमांचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
सप्टेंबर महिन्याच्याmaharashtra st employees वेतनासाठी १ हजार १५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, सरकारकडून केवळ ३८०.०६ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वेतनासाठी आवश्यक असलेल्या निधीची उर्वरित रक्कम कशी उपलब्ध होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर वेतनवाढीच्या फरकापोटी मंजूर करण्यात आलेले ५३८.८३ कोटी रुपये अद्याप मिळाले नसल्याचाही संघटनेचा आरोप आहे.
या आर्थिक प्रश्नांमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे. निधीअभावी एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. ऐन दिवाळीच्या काळात वेतन आणि इतर देणी रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे.आता सरकार ३ नोव्हेंबरपर्यंत निधी उपलब्ध करून देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढणार की संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार ४ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाची परिस्थिती निर्माण होणार, याकडे एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवेवर संपाचे सावट निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकारच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.