मुंबई
mika singh प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांच्या उत्तराखंडमधील एका कार्यक्रमावरून सध्या मनोरंजनविश्वात चर्चा रंगली आहे. कार्यक्रमादरम्यान उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांनी दलेर मेहंदी यांच्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त करत त्यांना मंचावरच सुनावले होते. यावेळी गायकाने मद्यपान केल्याचाही आरोप करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता दलेर मेहंदी यांचे भाऊ आणि गायक मिका सिंग त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. ‘दलेर मेहंदी दारू पिताना दिसले, तर मी गाणं सोडून देईन,’ असे थेट आव्हान मिका सिंगने दिले आहे.
मिका सिंगने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. दलेर मेहंदी गेल्या तीन दशकांपासून संगीतविश्वात सक्रिय असून, त्यांनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत दलेर मेहंदी यांना मद्यपान करताना कोणी पाहिले आहे का, असा सवाल मिकाने उपस्थित केला. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही कधी मद्याचा ग्लास दिसला आहे का, असा प्रश्न विचारत त्याने या आरोपांच्या विश्वासार्हतेवर शंका व्यक्त केली.
एखाद्या व्यक्तीला स्वतः मद्यपान करताना पाहिलेले नसताना त्याच्याविषयी इतक्या ठामपणे आरोप कसे केले जाऊ शकतात, असा प्रश्नही मिकाने उपस्थित केला. पुराव्याशिवाय एखाद्या कलाकाराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या बातम्या पसरवणे योग्य नसल्याचे त्याने म्हटले. दलेर मेहंदी मद्यपान करतात, या आरोपांना मिकाने स्पष्टपणे विरोध केला असून, आपल्या भावाच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे.
या प्रकरणात मिकाने कलाकारांच्या व्यावसायिक बांधिलकीचाही मुद्दा मांडला. अनेकदा कलाकार एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन आयोजकांना देतात. अशा वेळी प्रकृती ठीक नसतानाही दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांना मंचावर जावे लागते, असे त्याने सांगितले. स्वतःला १०४ अंश ताप असला, तरी आधी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम सादर करावा लागू शकतो, असे उदाहरणही त्याने दिले. दलेर मेहंदी यांनीदेखील आयोजकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कार्यक्रम केला असण्याची शक्यता मिकाने व्यक्त केली.
दलेर मेहंदी यांच्या प्रकृतीविषयी बोलताना मिकाने गेल्या दोन वर्षांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. ते अद्याप प्रकृतीतून सावरत असूनही आपल्या बँडसोबत कार्यक्रम करत असल्याचे त्याने नमूद केले. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणावर टीका करण्यापूर्वी त्यांच्या आरोग्याची आणि परिस्थितीची दखल घेणे आवश्यक असल्याचे मत मिकाने व्यक्त केले.
नेमकं काय घडलं होतं?
१८ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यातील कुंजापुरी मेळ्यात दलेर मेहंदी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रोत्सवाचा भाग असलेल्या या कार्यक्रमादरम्यान मंत्री सुबोध उनियाल मंचावर आले. त्यांनी दलेर मेहंदी यांच्या सादरीकरणाबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांना सुनावले. यावेळी गायकाने मद्यपान करून कार्यक्रम सादर केल्याचा आरोपही करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाने वेगळे वळण घेतले.आता मिका सिंगने आपल्या भावाच्या समर्थनार्थ घेतलेल्या भूमिकेमुळे हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. दलेर मेहंदी यांच्यावरील आरोपांवरून सुरू झालेल्या या प्रकरणात मिकाने थेट आव्हान देत आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढे कोणत्या प्रतिक्रिया उमटतात, याकडे संगीतविश्वाचे आणि चाहत्यांचे लक्ष लागले आहे.