मुंबई
Miranda Warning फार्महाऊसवर घडलेल्या खुनाच्या घटनेमागील रहस्य आणि खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेणारा थरारक प्रवास ‘मिरांडा वॉर्निंग’ या आगामी मराठी चित्रपटातून उलगडणार आहे. दमदार कलाकारांची फळी आणि रहस्याची उत्कंठा वाढवणारा कथाविषय यामुळे या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. येत्या २७ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, नुकताच त्याचा रंजक टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज यांच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रचे कल्पक जोशी यांनी चित्रपट सादर केला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या सचिन धोत्रे यांनी ‘मिरांडा वॉर्निंग’च्या माध्यमातून वेगळ्या विषयाची मांडणी केली आहे. चित्रपटाचे लेखन रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी केले आहे.
या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, जान्हवी किल्लेकर, सुरेश विश्वकर्मा, पायल जाधव, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, एकनाथ गीते आणि त्रिशा कमलाकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे, आदिनाथ कोठारे यांनी या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
फार्महाऊसवर खुनाची Miranda Warning घटना समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू होतो. तपासादरम्यान समोर येणारे नवनवे धागेदोरे, निर्माण होणाऱ्या शंका आणि गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल करत पोलिस अधिकारी खऱ्या गुन्हेगारापर्यंत कसे पोहोचतात, याभोवती चित्रपटाची कथा फिरते. गुन्ह्याच्या तपासातील तर्क-वितर्क आणि संशयाच्या विविध शक्यतांमधून उलगडत जाणारे रहस्य, अशी या चित्रपटाची रचना असल्याचे टीजरवरून सूचित होते.मराठी चित्रपटसृष्टीत यापूर्वीही सस्पेन्स आणि थ्रिलर प्रकारातील चित्रपटांची निर्मिती झाली आहे. मात्र, खुनाच्या प्रकरणाचा तपास आणि त्यामागील गुन्हेगाराचा शोध या केंद्रस्थानी असलेल्या ‘मिरांडा वॉर्निंग’मधून प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे. प्रभावी कथानक, अनुभवी कलाकार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम मांडणी यांच्या आधारे ही कलाकृती प्रेक्षकांसमोर येणार आहे.चित्रपटाच्या टीजरमुळे कथेबद्दलची उत्सुकता वाढली असून, फार्महाऊसवरील खुनामागचे नेमके सत्य काय, तपासादरम्यान कोणती रहस्ये समोर येणार आणि पोलिस अधिकारी गुन्हेगारापर्यंत कसा पोहोचणार, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २७ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.