मुंबई
mumbai ict विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना शिक्षण क्षेत्रासमोर गंभीर प्रश्न उभा करत आहेत. अशातच मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिद्धेश पाटील असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा नाशिकचा रहिवासी होता. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या डॉक्टरांना संदेश पाठवून मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे सांगितले होते.
सिद्धेश हा आयसीटीमध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्याचा सामना करत होता आणि त्यासाठी उपचारही घेत होता. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने वसतिगृहातील खोलीत गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.
मृत्यूपूर्वी सिद्धेशने आपल्या डॉक्टरांना संदेश पाठवून मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे कळवले होते. हा संदेश मिळताच डॉक्टरांनी तातडीने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर कुटुंबीयांनीही विलंब न करता वसतिगृहातील त्याच्या मित्रांना संपर्क करून सिद्धेशकडे जाण्यास सांगितले. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच त्याने टोकाचे पाऊल उचलले होते.
या घटनेमुळे सिद्धेशच्या mumbai ict कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आयआयटीमध्येही विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना घडली होती. त्यानंतर आता आयसीटीमधील या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि त्यांना वेळेवर मिळणाऱ्या मदतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास माटुंगा पोलीस करत आहेत. सिद्धेशच्या मृत्यूमागील परिस्थिती आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपासातून उलगडा होणार आहे.