उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला मनमाडमध्ये अधिकृत थांबा

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई
vande bharat express छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला मनमाड जंक्शन येथे अधिकृत व्यावसायिक थांबा मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या निर्णयाची माहिती दिली. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबई आणि शिर्डीला जाण्यासाठी जलद रेल्वेसेवेचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे.
 

mumbai-shirdi vande bharat express gets official halt at manmad junction 
यापूर्वी मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मनमाड स्थानकावर थांबत होती. मात्र, हा थांबा केवळ तांत्रिक कारणांसाठी असल्याने प्रवाशांना तेथून गाडीत चढता किंवा उतरता येत नव्हते. त्यामुळे मनमाड आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना या रेल्वेसेवेचा थेट लाभ घेता येत नव्हता. आता अधिकृत व्यावसायिक थांबा मंजूर झाल्याने ही अडचण दूर होणार आहे.
मनमाड येथे थांबा मिळाल्याचा फायदा केवळ स्थानिक प्रवाशांनाच नव्हे, तर मालेगाव, नांदगाव, चांदवड, सटाणा, देवळा, येवला आणि चाळीसगाव परिसरातील प्रवाशांनाही होणार आहे. या भागातील नागरिकांना मुंबई तसेच शिर्डीला जाण्यासाठी अधिक वेगवान आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.दरम्यान, मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसच्या संभाव्य प्रारंभाबाबतही चर्चा सुरू आहे. या रेल्वेची अलीकडेच मुंबई ते लोणावळा मार्गावर चाचणी घेण्यात आल्याची माहिती आहे. बंगळुरूचे खासदार पी. सी. मोहन यांनी ही ट्रेन १ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून या तारखेला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.