मैदानांखाली उभारणार पार्किंगचे जाळे

पहिल्या टप्प्यात सहा जागांची निवड

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई
underground parking वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ यामुळे मुंबईतील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करून उपलब्ध जागेचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेने आता उद्याने आणि मोकळ्या मैदानांच्या खाली भूमिगत पार्किंग उभारण्याची योजना आखली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी शहरातील सहा ठिकाणांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
 

mumbai to build underground parking beneath gardens and playgrounds, six sites selected in first phase 
दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट आणि आसपासच्या परिसरात सरकारी व खासगी कार्यालये तसेच पर्यटनस्थळांमुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. परिणामी, रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले असून, वाहतूक व्यवस्थेवर त्याचा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौकातील अप्सरा पेन शॉपजवळ बहुमजली रोबोटिक सार्वजनिक भूमिगत पार्किंग उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी अशा प्रकारच्या सुविधांचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे.
मुंबईतील प्रत्येक महापालिका प्रभागात अशा पार्किंग सुविधा उभारून संपूर्ण शहरात २७ ठिकाणी भूमिगत पार्किंग विकसित करण्याचे नियोजन असल्याचे भाजपचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मुंबईसाठी अशा सुविधांची आवश्यकता अधोरेखित केली होती.
दरम्यान, भूमिगत पार्किंगसाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या सल्लागाराने शहरातील ३२ मोकळी मैदाने आणि उद्यानांची पाहणी केली. या पाहणीनंतर पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. यामध्ये कांदिवली पूर्वेतील आशानगर येथील राजीव गांधी उद्यान, कांदिवली पश्चिमेतील कमला विहार क्लब, कांदिवली पूर्वेतील मौजे आकुर्ली येथील सीटीएस क्रमांक १७१/१ अ/४१, बोरिवली पूर्वेतील चिकूवाडी येथील बाळासाहेब ठाकरे मैदान, बोरिवली पश्चिमेतील नायतोडी मैदान आणि घाटकोपर पूर्वेतील पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदान यांचा समावेश आहे.
या सहाही ठिकाणी दुमजली भूमिगत पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तो मुंबई महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सध्या मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत ३७ सार्वजनिक पार्किंग सुविधा आणि रस्त्यांवरील ६७ पार्किंग स्थळे उपलब्ध आहेत. मात्र, शहरातील वाहनांची प्रचंड संख्या लक्षात घेता ही व्यवस्था अपुरी ठरत आहे. त्यामुळे पारंपरिक पार्किंग व्यवस्थेच्या जोडीला बहुमजली आणि अत्याधुनिक रोबोटिक भूमिगत पार्किंगचा पर्याय पुढे आणला जात आहे. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या सहा जागांव्यतिरिक्त इतर संभाव्य ठिकाणांचाही महापालिकेकडून शोध सुरू आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास रस्त्यांवरील पार्किंगचा ताण कमी होण्यास आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.