दीक्षाभूमी परिसरातून १४४ टन कचऱ्याची उचल

मनपाचे अहोरात्र स्वच्छता अभियान

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |



नागपूर,
nagpur-deekshabhoomi-waste-cleanup-2026७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दीक्षाभूमी परिसरात तीन दिवसांत तब्बल १४४ टन कचरा उचलला. लाखो अनुयायांच्या आगमनामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने तीन पाळ्यांमध्ये ८७२ सफाई कर्मचारी, २३४ कचरा संकलक आणि १०८ वाहनांची व्यवस्था केली होती. याशिवाय १९० कचरा कुंड्या, तीन सक्शन मशीन, तीन चोकेज मशीन आणि भांडेवाडी येथे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चार कॉम्पॅक्टरचा वापर करण्यात आला. दीक्षाभूमीसह अंबाझरी, बेझनबाग आणि उंटखाना परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. १८ ऑक्टोबरपासून मनपाचे कर्मचारी २४ तास कार्यरत होते.
 

nfg 

महापौर नीता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या निर्देशानुसार स्वच्छता, नागरी सुविधा आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि परिवहन समिती सभापती मंगला खेकरे यांनी व्यवस्थेची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त अंकीत, मुरुगानंथम एम. आणि मिलिंद मेश्राम यांनीही नियोजनासाठी प्रयत्न केले. परिसरात अनुयायांच्या निवासासाठी २१ डोम आणि १२०० हून अधिक शौचालये उभारण्यात आली होती. ही शौचालये गटार वाहिन्यांना जोडण्यात आली होती. पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यांवर १२० नळांची व्यवस्था करण्यात आली, तर निवारा केंद्रांवरही पाणी उपलब्ध करून देण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाला मदत करण्यासाठी ४४ कायमस्वरूपी आणि १६ तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले. अँटनी वेस्ट हँडलिंग कंपनी, बीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि एनडीएसच्या पथकांनीही स्वच्छता मोहिमेत योगदान दिले.

 

दरम्यान, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवरून ड्रॅगन पॅलेस, चिचोली येथील शांतिवन आणि शहरातील इतर भागांत जाण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाने ‘आपली बस’ची विशेष व्यवस्था केली होती. १८ ते २० ऑक्टोबरदरम्यान एकूण ५८ हजार ८४ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. यासाठी २६७ बस तैनात करण्यात आल्या होत्या. १८ ऑक्टोबरला दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस मार्गावर १२ बसमधून १२०४ प्रवाशांनी प्रवास केला. १९ ऑक्टोबरला या मार्गावर ४९ बसमधून ९६२५ अनुयायांनी प्रवास केला, तर दीक्षाभूमी ते चिचोली मार्गावर सहा बसमधून ५३४ प्रवाशांनी सेवा घेतली. २० ऑक्टोबरला सर्वाधिक ४१ हजार १७५ अनुयायांनी ड्रॅगन पॅलेससाठी ‘आपली बस’चा वापर केला. यासाठी १४५ बसची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय नारा, चिचोली, नारी, गांधीपुतळा, बेलतरोडी, यशोधरानगर आणि गिड्डोबानगर या भागांसाठीही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली.