नागपुरात रुग्णांना दलालांचा विळखा!

रामदास पेठेत परराज्यातील रुग्णांची दिशाभूल; कमिशनसाठी डॉक्टर बदलण्याचा प्रकार

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |

प्रणव सातोकर

नागपूर,
nagpur-hospital-agent-fraudनागपूर शहराची ओळख मेडिकल हब म्हणून निर्माण झाली आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह विविध राज्यांतून हजारो रुग्ण उपचारासाठी नागपुरात येतात. मात्र, याच रुग्णांच्या भाषेच्या अज्ञानाचा आणि अनोळखी शहरातील परिस्थितीचा फायदा घेत काही दलालांकडून त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. विशेषतः रामदास पेठ या वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या भागात दलालांचा सुळसुळाट असल्याची चर्चा आहे.
 

dalal
 
Ai निर्मित इमेज 👆🏻
रामदास पेठ परिसरात अनेक नामांकित रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टरांची क्लिनिक्स आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची या भागात मोठी वर्दळ असते. मात्र, उपचारासाठी योग्य डॉक्टरांचा शोध घेत असताना काही रुग्ण दलालांच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र आहे.
 
गोड बोलून विश्वास संपादन; कमिशनसाठी डॉक्टर बदल!
परराज्यातून आलेल्या रुग्णांशी संवाद साधत त्यांचाच परिचित, एकाच गावाचा किंवा जिल्ह्याचा असल्याचे सांगून काही दलाल त्यांचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर रुग्णांना अपेक्षित डॉक्टरांकडे घेऊन जाण्याऐवजी दुसऱ्याच डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात नेले जाते. या माध्यमातून संबंधित दलालांना कमिशन मिळत असल्याचा आरोप आहे.
 
 

tdtdtd
Ai निर्मित इमेज 👆🏻
भाषेची अडचण, शहराची अपुरी माहिती आणि आजारपणामुळे निर्माण झालेली मानसिक घालमेल यामुळे रुग्णांना अशा प्रकारांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. उपचारासाठी आधीच आर्थिक आणि मानसिक तणावाखाली असलेल्या रुग्णांसाठी हा प्रकार त्रासदायक ठरू शकतो.
 
डॉक्टरांकडून जनजागृतीचा प्रयत्न
या प्रकारांना आळा घालण्यासाठी रामदास पेठ परिसरातील काही डॉक्टरांनी आपल्या क्लिनिकबाहेर सूचना फलक लावले आहेत. रुग्णांनी थेट क्लिनिकशी संपर्क साधावा आणि अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून डॉक्टर बदलू नयेत, असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्राची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः परराज्यातून येणाऱ्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळावे व उपचारासाठी नागपुरात येणाऱ्या रुग्णांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.