अल्पवयीन मुलीशी बळजबरी करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा

चाकूचा धाक दाखवून लूट केल्याचे प्रकरण

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,

Nagpur POCSO आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीसोबत दुचाकीने जात जाणाऱ्या युवकाला जंगलात दोन आरोपींनी अडविले. युवकाकडील पैसे हिसकावले आणि मैत्रिणीशी अश्लील चाळे करीत बळजबरी करीत तिला जंगलात नेण्याचा प्रयत्न केला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. ए. अंसारी यांनी आरोपी अतुल अशोक भोंडेकर (३३, रा. खैरीगाव, कामठी) याला दोषी ठरवून ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दुसऱ्या आरोपीचा शिक्षा सुनावण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, हे विशेष.
 
 
 

Nagpur POCSO Case: Man Sentenced to 3 Years in Jail for Robbery and Assault on Minor 
राणी दुर्गावती चौक येथील कुणाल ज्ञानेश्वर मंचलवार (२३) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अतुल भोंडेकर आणि धर्मराज थोरवे यांच्याविरुद्ध लूटमार, मारहाण, छेडछाड आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. १४ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी कुणाल हा आपल्या १७ वर्षांच्या मैत्रिणीसोबत दुचाकीने मावशीच्या घरी जात होता. कामठीतील खैरीगाव परिसरातील जंगलात आरोपी अतुल भोंडेकर आणि धर्मराज थोरवे यांनी त्यांना अडवले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ४ हजार ६०० रुपये रोख आणि मोबाइल हिसकावून घेतला. यावेळी कुणालसोबत असलेल्या मैत्रिणीला जबरदस्तीने जंगलात नेण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला असता तिला मारहाण केली आणि अश्लील चाळे केले. तसेच तिच्याशी हात पकडत गैरवर्तन केल्याचा आरोप होता. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, सहआरोपी धर्मराज थोरवे याचा मृत्यू झाल्याने अतुल भोंडेकर याच्याविरुद्ध खटला चालवण्यात आला. सरकारी वकील योगिता राऊत यांनी न्यायालयात आरोप सिद्ध केले. त्यानंतर न्यायालयाने अतुल भोंडेकर याला लूटमार आणि पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोहवा ज्ञानेश्वर गायधने यांनी अभियोजन पक्षाला सहकार्य केले.